27 C
Mumbai
Monday, April 14, 2025
घरविशेषमनोज कुमार : अभिनेता, दिग्दर्शक आणि होमिओपॅथीचा डॉक्टरही!

मनोज कुमार : अभिनेता, दिग्दर्शक आणि होमिओपॅथीचा डॉक्टरही!

विविधांगी भूमिका, गीत संगीताने त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले

Google News Follow

Related

स्वतःच्या अशा विशिष्ट अभिनय शैलीने रसिकांच्या मनावर ठसा उमटविणारे आणि देशभक्तीपर चित्रपटांनी जनसामान्यांची मने जिंकणारे मनोज कुमार यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपट प्रवासाचा पट उलगडत गेला. कृष्णधवल ते रंगीत चित्रपट असा त्यांचा कलाकार, दिग्दर्शक असा झालेला प्रवास खास असाच होता. आज इतक्या वर्षानंतरही मनोज कुमार यांच्या त्या चित्रपटांनी लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे. भारत कुमार या नावाने लोकप्रिय झालेल्या या कलाकाराला पुढेही लोक कायम लक्षात ठेवतील.

मनोज कुमार: ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे एक नाव. मनोज कुमार हे दिलीप कुमार यांचे प्रचंड चाहते होते. एका चित्रपटात दिलीप कुमार यांचा नाव ‘मनोज’ पाहून त्यांनी आपले नावही मनोज ठेवले. देशभक्ती त्यांच्या रक्तात भिनली होती, म्हणूनच त्यांच्या चित्रपटांतून कायमच भारतमातेबद्दलचा अभिमान जाणवतो. विशेष म्हणजे आज चित्रपट रसिक हे मनोज कुमार यांना अभिनेता, दिग्दर्शक म्हणूनच ओळखतात, पण ते उत्तम होमिओपॅथिक डॉक्टरही होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे.

तीन दशके प्रेक्षकांच्या हृदयावर त्यांनी राज्य केले. समाजातील प्रत्येक वर्गाशी त्यांच्या भूमिकांची नाळ जुळली आणि भारताची संस्कृती व मूल्यांचा प्रचारातून मनोज कुमार हे भारत कुमार बनले. डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघणे, चेहऱ्यावर हात फिरवणे ही त्यांची शैली इतकी लोकप्रिय ठरली की, अनेक कलाकारांनी याची नक्कल करून प्रसिद्धी मिळवली.

त्यांचे मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. आजच्या पाकिस्तानात त्यांचा जन्म झाला. हरिकृष्ण १९३७ साली पाकिस्तानात असलेल्या अ‍ॅबटाबाद येथे जन्मला. फाळणीच्या काळात त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले. दिल्लीच्या गजबजलेल्या रस्त्यांवरच हरिकृष्णला सिनेमाची ओढ लागली. हिंदू कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईकडे प्रस्थान केले.

त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट त्यांच्या किशोरवयात आला. केवळ ११ वर्षांचा असताना त्यांनी दिलीप कुमार यांचा शबनम (१९४९) पाहिला, आणि हा सिनेमा त्यांच्या आयुष्याचा मार्गच बदलून गेला. त्या दिवसापासून त्यांनी दिलीप कुमार यांना आपले आदर्श मानले. दिलीप कुमार यांचा अभिनय आणि त्यांनी साकारलेले ‘मनोज’ नावाचे पात्र – दोघांनी हरिकृष्णवर इतका खोल प्रभाव टाकला की त्याच दिवशी त्यांनी ठरवले की एक दिवस जर ते अभिनेता झालेच, तर त्यांचे पडद्यावरील नाव ‘मनोज’ असेल.

हे ही वाचा:

बांगलादेशातील हिंदूंच्या दारुण अवस्थेवर पंतप्रधान मोदींनी बोट ठेवले!

उत्तर प्रदेश: ५० वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणाऱ्या १० मुस्लिमांची घरवापसी!

“रामलल्लांचा आशीर्वाद मिळाला, आता चौकारांचा प्रसाद मिळणार!”

सावरकरांवरील वादग्रस्त विधानाप्रकरणी राहुल गांधींना धक्का, कोर्टाने याचिका फेटाळली!

वर्षानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात आले. हरिकृष्ण गोस्वामी बनले ‘मनोज कुमार’ – असा अभिनेता ज्याने आपल्या देशभक्ती, प्रतिभा आणि निष्ठेने भारतीय सिनेमाचा चेहराच बदलून टाकला. ते अनेक मुलाखतींमध्ये शबनम मधील दिलीप कुमार यांच्या ‘मनोज’ पात्राचा उल्लेख करत असत, तो क्षण त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरला.

१९६२ मध्ये आलेल्या हरियाली और रास्ता या चित्रपटामुळे मनोज कुमारना खऱ्या अर्थाने यश मिळाले. माला सिन्हा यांच्या सोबतीने त्यांनी या रोमँटिक ड्रामामध्ये काम केले. त्यानंतर साधनासोबत केलेल्या वो कौन थी? या रहस्यप्रधान चित्रपटाने त्यांचे स्थान अधिक मजबूत केले. मदन मोहन यांच्या लग जा गले आणि नैना बरसे रिमझिम या गाण्यांमुळे चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला.

१९६५ मध्ये आलेल्या शहीद या चित्रपटामुळे मनोज कुमारचा कल देशभक्तीपर चित्रपटांकडे वळला. भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला. शहीद करताना कदाचित मनोज कुमारनेही कल्पना केली नसेल की देशभक्ती हेच त्यांचे ‘ट्रेडमार्क’ होईल.

उपकार हा त्यांचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटाची प्रेरणा त्यांना पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या “जय जवान, जय किसान” या घोषणेतून मिळाली. उपकार हा मनोज कुमारचा दिग्दर्शक म्हणून पहिला प्रयत्न होता आणि त्यांना मोठं यश मिळालं. “मेरे देश की धरती” हे गाणं आजही स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी वाजवलं जातं.

१९६० आणि १९७० च्या दशकात पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान यांसारख्या चित्रपटांनी देशभक्तीचा संदेश देत त्यांचे स्थान अधिक दृढ केले. त्यांच्या या भूमिकांमुळे त्यांना “भारत कुमार” हे बिरुद लाभले. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी हिमालय की गोद में, पत्थर के सनम, दो बदन, सावन की घटा यांसारख्या रोमँटिक चित्रपटांपासून गुमनामसारख्या थरारपटांपर्यंत काम केलं, पण देशभक्तीपर भूमिका हेच त्यांचं खरे ओळख बनले.

स्वातंत्र्यानंतरच्या भारताचे स्वप्न, संघर्ष आणि आशा त्यांनी पडद्यावर प्रभावीपणे मांडली. त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि २०१५ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या दो बदन सहकलाकार आशा पारेख म्हणाल्या होत्या, “मनोज एक ऑलराउंडर होते.” ते उत्तम दिग्दर्शक, लेखक, गीतकार आणि होमिओपॅथिक डॉक्टर देखील होते – ही गोष्ट फार लोकांना ठाऊक नसेल.

मनोज कुमार यांच्या निधनाने एक युग संपलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्याप्रमाणे – “ते भारतीय सिनेमाचे प्रतीक होते.” त्यांच्या चित्रपटांनी राष्ट्राभिमान जागवला आणि “भारत कुमार” हे नाव कायमस्वरूपी इतिहासात अजरामर झाले.

चित्रपट प्रवासाची सुरुवात १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटाने झाली, आणि हा प्रवास १९८० च्या दशकापर्यंत सुरू राहिला. त्या काळातील त्यांच्या ७ सुपरहिट चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. हे चित्रपट असे-

शहीद (१९६५):

भगतसिंगच्या भूमिकेत मनोज कुमार प्रेक्षकांच्या काळजात घर करून गेले. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांची कथा आजही अंगावर रोमांच उभे करते.

उपकार (१९६७)

पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषवाक्यावर आधारित हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील एक ‘कल्ट’ ठरला. ‘मेरे देश की धरती’ हे गीत आजही मनामनात उर्जा निर्माण करते.

पत्थर के सनम (१९६७)

एका प्रेमकथेत दोन स्त्रियांमध्ये गुंतलेला नायक – ‘राजेश’ ही भूमिका उपकारमधील ‘भारत’च्या भूमिकेहून पूर्णतः वेगळी ठरली.

पूरब और पश्चिम (१९७०)

एनआरआय विषयावर आधारित पहिली हिंदी फिल्म. भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य प्रभाव यांच्यातील संघर्ष दाखवणारा प्रभावी चित्रपट. ‘प्रीत जहां की रीत सदा’ हे गाणं आजही गोड वाटतं.

शोर (१९७२)

बाप-लेकाच्या नात्याचं सुंदर चित्रण या चित्रपटात होतं. हसवत हसवत अंतर्मुख करणारी कथा.मनोरंजनासोबत चित्रपटाने रसिकांच्या भावनांनाही हात घातला.

रोटी, कपड़ा और मकान (१९७४)

समाजातील विषमता, गरिबी, भ्रष्टाचार यावर करारी प्रहार करणारा चित्रपट. त्यातील गाणी, संवाद आणि कथा आजही विचार करायला लावतात.

 क्रांति (१९८१)

मनोज कुमार यांच्या कारकिर्दीतील शेवटचा भव्य देशभक्तिपूर्ण चित्रपट. या चित्रपटाने अफाट यश मिळविले. देशासाठी बलिदान देणाऱ्या योद्ध्यांची ही कहाणी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
242,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा