मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकांसाठी उमेदवारी देण्यासाठी आम्हाला वेळ लागत आहे पण माझा समाज एकत्र आहे. आमचे मराठे १०० टक्के एकत्र राहणार. फडणवीसांनी आम्हाला बेजार केले म्हणून लढत आहोत. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी ही टीका केली.
जरांगे यांनी मराठा आंदोलकांना सांगितले की, राजकारणाचे वेड लागू देऊ नका. एखादा आमदार निवडून आला तरी तो आपल्यासाठी आधार ठरेल. २०० लढून पडण्यात अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत. निवडून आलेला आमदार आपली बाजू मांडेल. विधानसभेत मराठा आरक्षण मुद्द्यावर भांडेल.
जरांगे यांनी पुन्हा भावनिक होत म्हटले की, आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार द्यायचा आहे. त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी एक माणूस द्यायचा आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी नाराज न होता जात बघा. आम्हाला आमच्या हक्काचा आमदार हवा आहे.
हे ही वाचा:
‘असदुद्दीन ओवेसींकडून मुस्लिमांना भडकवण्याचे काम’
अहिल्यानगर पुणे महामार्गावरून २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त
‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून संजय राऊतांकडून अरविंद सावंतांची पाठराखण
केंद्रीय गृहमंत्र्यांवरील आरोपांप्रकरणी भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्याला बजावले समन्स
मनोज जरांगे यांच्यातर्फे काही उमेदवाऱ्या संध्याकाळी जाहीर होणार आहेत. या निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच मनोज जरांगे हे निवडणूक लढविणार असल्याचे सांगत होते. अखेर त्यांनी आता मराठा, दलित, मुस्लिम असे समीकरण जुळवण्याचे ठरवत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. रविवारी ३ नोव्हेंबरला ते संध्याकाळी उमेदवार जाहीर करणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी आता फडणवीसांच्या नावाचा थेट उल्लेख न करता कुणाची तरी जिरवणार असल्याचे म्हटले.