दिव्यांग, अनाथ, आदिवासी वंचित विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न बघता यावी व ती मोठी स्वप्न पूर्ण करण्याची संधी, सर्व व्यवस्था एकाच ठिकाणी देणारा हा प्रकल्प बघून अत्यंत आश्चर्य आणि आनंद वाटला. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणे अत्यंत आवश्यक आहे. दिव्यांग, अनाथ युवकांसाठी दीपस्तंभ मनोबल देशातील आदर्श प्रकल्प आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
स्वामी विवेकानंद व जिजाऊ जयंती निमित्ताने आयोजित दीपस्तंभ मनोबल प्रकल्पाच्या कलश पुजन कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार डॉ.नरेंद्र जाधव, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, महाराष्ट्राचे धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन, आर.सी.बाफना ट्रस्टचे कस्तुरचंद बाफना, उद्योगपती रमणलाल लुंकड, प्रकाश धारीवाल, पगारिया फाऊंडेशनचे पुखराज पगारीया, कमला एज्युकेशन सोसायटीचे दीपक शहा, सनराईस कँडल्सचे भावेश भाटिया, जळगावचे आमदार राजूमामा भोळे हे उपस्थित होते.
कलश पुजन संस्थेचे संचालक डॉ.राजेश डाबी व अमिषा डाबी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सुरवातीला संग्राम जोशी यांनी पोवाडा आणि मनोबलची प्रज्ञाचक्षु विद्यार्थिनी नाजनीन हिने एकदंताय या गाण्याचे सादरीकरण केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चैताली पातावार हिने तर सूत्रसंचालन प्रज्ञाचक्षू शिवा परमार आणि यजुर्वेंद्र महाजन यांनी केले.आभार माऊली अडकुर या विद्यार्थिनिने मानले.
प्रत्येकात एक राजहंस लपलेला आहे आणि तो शोधण्याचे काम मनोबल प्रकल्प करत आहे. प्रेम, प्रोत्साहन, आत्मसन्मान, आत्मविश्वास वाढविणारा हा प्रकल्प देशात स्वतःच्या कामाने नवीन मानदंड प्रस्थापित करेल हा ठाम विश्वास मला आहे असे प्रतिपादन माजी खासदार नरेंद्र जाधव यांनी केले .
निसर्गाने लादलेल्या दिव्यांगांची आराधना करणे सोपे काम नाही, हे काम मनोबल प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे. आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या माध्यमातून पुढील दहा वर्षात न दिसणाऱ्याला दिसेल, ऐकू न येणाऱ्याला ऐकू येईल तरी सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी मनोबल सारख्या प्रकल्पाची गरज निश्चितच राहणार आहे अश्या भावना उदय निरगुडकर यांनी व्यक्त केल्या.
१८ वर्षावरील अनाथ, दिव्यांग मुलांसाठी निवासी उच्च शिक्षणाची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली आहे.तंत्रज्ञान प्रशिक्षण व दिव्यांग संदर्भातील रिसर्च करण्यासाठी आयआयटी हैदराबाद या संस्थेसोबत करार केला आहे. त्यामुळे मनोबल प्रकल्प आता वटवृक्ष झाल्याच्या भावना महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी व्यक्त केल्या. २१ प्रकारच्या दिव्यांगाच्या दृष्टीकोनातुन जगभरातील उच्चतम तंत्रज्ञान वापरून दिव्यांगासाठी अडथळा विरहीत बांधकाम करतांना अद्भुत अनुभूतीची समृद्धी मनोबल प्रकल्पाने आम्हांला दिली अश्या भावना यावेळी बिटा कंस्ट्रक्शनचे भरत अमळकर यांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थी वामीका शर्मा, पूजा कदम, दिनेश कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उद्योजक पुखराज पगारिया यांनी एक कोटी देणगी संस्थेला देण्याचे घोषित केले तर मंत्रालयात उद्योग व कामगार उर्जा विभागात कार्यरत असलेल्या मनोबलची माजी दिव्यांग विद्यार्थिनी रिना बारेलाने प्रकल्पास ५ हजार रुपये योगदान दिले.
मनोबल प्रकल्पास मोलाचे योगदान देणारे कस्तुरचंद बाफना, प्रकाश धारीवाल, रमणलाल लुंकड, पुखराज पगारिया, प्रशांत देशपांडे, आनंद खोत, दीपक शहा, रोटरी क्लब निगडीचे अनिल कुलकर्णी, सेंटर फार्मास्युटिकलचे संजय आचार्य, स्टॅनली ब्लॅक अँड डेकरचे मिलिंद आवळगावकर, बंगलोरचे अभय दीक्षित, सेफ वॉटरलाईनचे धीरज कोटीयन, एसटीसीआयचे विशाल मांढरे, डोनाल्डसनचे मनोज पांडे, डॉ.अलका मांडके आर्किटेक्ट शरद महाजन, विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबाद्दल मीनाक्षी निकम यांना कृतज्ञता सन्मान देवून गौरवण्यात आले.कार्यक्रमास भारतभरातून अनेक कंपन्याचे प्रतिनिधी, देणगीदार, मान्यवर, माजी विद्यार्थी, सल्लागार, संचालक आणि मनोबलचे विद्यार्थी उपस्थित होते.
हे ही वाचा:
मतपेटीमध्ये ठरणार आज कोणाचा होणार जय
पुण्यातील कोयता गँगचा ‘आधार’च काढून घेणार
भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळाला पाच कोटींचा चेक
एकेकाळचे कट्टर वैरी बनले अदाणींचे तारणहार…
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल हा १८ वर्षावरील सर्व प्रकारचे दिव्यांग, अनाथ, आदिवासी व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एकत्रित निवासी उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण यासाठीचा देशातील पहिला प्रकल्प आहे. सध्या जळगाव व पुणे येथील प्रकल्पात १५ राज्यांमधील ३०० दिव्यांग ,अनाथ व आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षण व विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेत आहेत.विशेषतः सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी अडथळा रहित कॅम्पस, आवश्यक तंत्रज्ञान व तज्ञ मार्गदर्शक असलेला मॉडेल प्रकल्प आहे.
या प्रकल्पात डिजिटल क्लासरूम, रिसर्च सेंटर, लर्निंग लॅबोरेटरी, टेक्नॉलॉजी एक्सपिरीयन्स सेंटर, सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर, सायकॉलॉजिकल कौन्सिलिंग, एक्सेसिबल रीडिंग रूम व लायब्ररी इत्यादी विभाग आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांनुसार संपूर्ण कॅम्पस दिव्यांग विद्यार्थी कुणाच्याही मदती शिवाय स्वयंपूर्णतेने सर्व व्यवस्था वापरू शकतात. 3 एकर परिसरात, 75000 sq ft 4 इमारती, ग्राउंड , पर्यावरणपूरक व्यवस्था येथे केलेल्या आहेत. एकूण ३२० विद्यार्थ्यांची या प्रकल्पात सोय होणार आहे.मार्च २०२३ पर्यंत या प्रकल्पाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होणार आहे.
सर्व प्रकारचे दीव्यांग,अनाथ, आदिवासी व ग्रामीण विदयार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी विविध उच्च शिक्षणातील कोर्सेस साठी आवश्यक प्रवेश परीक्षा ( MBA, MSW, JJ School Of Art, IIT, IIM ) स्पर्धा परीक्षा ( UPSC, MPSC, SSC, Bank, Railway ) तसेच प्रत्यक्ष कोर्सेस करण्यासाठी विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग, मार्गदर्शन कोर्सेस , तंत्रज्ञान, व्यक्तिमत्व विकास अशा सर्व बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.