बास्केटबॉलपटू मनिषा सत्यजीत डांगे यांनी एक अनोखा विक्रम करून दाखविला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या मनिषा यांनी त्यांच्या प्रशिक्षकांनी असा विक्रम करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आणि त्यांनी हा विक्रम केलादेखील. कोणता होता तो विक्रम?
मध्य रेल्वेकडून बास्केटबॉलपटू म्हणून खेळत असलेल्या सीनियर खेळाडू मनिषा डांगे यांनी दोन महिन्यांपूर्वी एक विक्रम नोंदविला. तब्बल २२ मीटर अंतरावरून म्हणजेच ६६ फुटांवरून त्यांनी बास्केटबॉल अचूक बास्केट केला. ही कामगिरी करण्याची कल्पना त्यांना का सुचली?
मनिषा डांगे यांनी ‘न्यूज डंका’शी साधलेल्या संवादात सांगितले की, गेली ३० वर्षे झाली या क्षेत्रात मी खेळत आहे. मध्य रेल्वेकडून खेळत असतानाच कोचिंगही सुरू आहे. पतियाळाच्या एनआयएसमध्ये डिप्लोमाही झाला आहे. दोन वर्षांपूर्वी बास्केटबॉलमधील कामगिरीचे कौतुक म्हणून छत्रपती पुरस्कारही मिळाला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सातवेळा मनिषा यांनी भारताचे प्रतिनिधित्व. ३X३ आशिया बास्केटबॉल चॅम्पियनशीपमध्ये त्या खेळल्या आणि तिथे भारतीय संघाने सुवर्ण जिंकले होते.
हे ही वाचा:
येडियुरप्पा अखेर पायउतार होणार
…आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले
पूरग्रस्तांच्या मनाला डागण्या देणारे दौरे करण्यापेक्षा मुख्यमंत्री घरी बसलेले बरे होते…
कारगिल हुतात्म्यांना देशवासियांकडून श्रद्धांजली
ही कल्पना कशी सुचली असे विचारल्यावर मनिषा म्हणतात की, कोविडमध्ये स्पोर्टस बंद असल्यामुळे सगळेच खेळाडू निराश होते. काहीतरी प्रेरणा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. या विक्रमासाठी मला रेल्वेने मैदान उपलब्ध करून दिले. परळला मध्य रेल्वेच्या मैदानावर मी ही कामगिरी केली. ही कल्पना एनआयएसमधील माझे प्रशिक्षक वर्मा सर यांनी माझ्या डोक्यात घातली. मी केलेले असे प्रयत्न पाहून त्यांना असा विश्वास होता की, मी असा एखादा विक्रम करू शकते.
मनिषा म्हणतात की, एवढी वर्षे खेळते आहे त्यामुळे हाफ कोर्टवरून शॉट्स टाकतोच आहोत. २८ मीटर बास्केटबॉल कोर्टवर क्वचित असा कुणी प्रयत्न करते. कारण एवढ्या लांबून अचूक बास्केट होणे कठीण असते. खांद्यात ताकद असावी लागते. ३० वर्षे या खेळात असल्यामुळे तेवढा अंदाज नक्कीच होता. मे महिन्यात हा मी यशस्वी प्रयत्न केला. २१ जूनला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने यावर शिक्कामोर्तब केले. नंतर जुलै महिन्यात एशिया बुक ऑफ रेकॉर्डसने त्यावर शिक्कामोर्तब केले. गिनिस बुकसाठीही विक्रम करण्याचाही प्रयत्न असेल.