संसदेत गोंधळ घातल्या प्रकरणी एक राज्यसभा आणि १४ लोकसभा खासदार निलंबित!

निलंबित १५ खासदारांपैकी ९ काँग्रेसचे, २ सीपीएम, २ डीएमके आणि एक सीपीआय पक्षाचे

संसदेत गोंधळ घातल्या प्रकरणी एक राज्यसभा आणि १४ लोकसभा खासदार निलंबित!

संसदेच्या सुरक्षेमध्ये कुचराई केल्याप्रकरणी आज विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे एक राज्यसभा आणि १४ लोकसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.गोंधळ घालणे आणि खुर्चीचा अपमान केल्याप्रकरणी आतापर्यंत १५ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या १५ खासदारांपैकी ९ काँग्रेसचे, २ सीपीएम, २ डीएमके आणि एक सीपीआय पक्षाचे आहेत. निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस खासदारांमध्ये टीएन प्रतापन, हिबी एडन, एस जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांचा समावेश आहे. या खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आणला होता, तो सभापतींच्या खुर्चीवर बसलेल्या भर्तृहरी महाताब यांनी मंजूर केला. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी या खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यावेळी विरोधी पक्षाचे खासदार सतत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत होते.

हे ही वाचा:

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करणार

‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार

पश्चिम बंगालमधील शिल्पकारांनी साकारली अयोध्येच्या राम लल्लाची मूर्ती

मथुरेतील शाही ईदगाह मशिदीच्या जागेचा सर्व्हे करण्याचे आदेश

याशिवाय तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांना अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.लोकसभेचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, “कालची घटना दुर्देवी होती. पण यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. या प्रकरणात राजकारण होता कामा नये. त्यानंतर राज्यसभेतही गोंधळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.

दरम्यान, १३ डिसेंबर रोजी संसदेत झालेल्या हल्ल्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून सहावा आरोपी अद्याप फरार आहे.लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारणारा आरोपी सागर शर्मा हा लखनऊचा तर मनोरंजन हा कर्नाटकातील बेंगळुरूचा आहे. तसेच संसदेबाहेर अटक करण्यात आलेली महिला नीलम ही हरियाणाच्या जिंद येथील रहिवासी आहेत. २५ वर्षीय अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे चौघेही आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले होते.तर सहावा आरोपी ललित झा अजूनही फरार आहे.

 

Exit mobile version