चांद्रयान-३चे आपणच डिझाइन केल्याचा दावा करणाऱ्याला अटक

चांद्रयान ३ ने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर त्याने मुलाखत देऊन खोटा दावा केला

चांद्रयान-३चे आपणच डिझाइन केल्याचा दावा करणाऱ्याला अटक

चांद्रयान-३च्या लँडर मॉड्युलचे डिझाइन करण्याचा खोटा दावा करणाऱ्या एका व्यक्तीला गुजरातच्या सुरत पोलिसांनी अटक केली आहे. तो स्वत: इस्रोचा वैज्ञानिक असल्याचे सांगत होता. चांद्रयान ३ ने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर त्याने मुलाखत देऊन खोटा दावा केला होता. त्यामुळे वादाचे मोहोळ उठले होते.

या व्यक्तीचे नाव मितुल त्रिवेदी असून तो ३० वर्षांचा आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो त्याच्या कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खोटे दावे करत असे. त्याने स्थानिक प्रसारमाध्यमांकडे चांद्रयान-३ने डिझाइन स्वत: केल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीवर फसवणूक, फसवणुकीच्या उद्देशाने कट रचणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या खासगी कोचिंग क्लासमध्ये मुलांना आकर्षित करण्यासाठी तो स्वत:ला इस्रोचा कर्मचारी असल्याचे सांगत असे. त्याने केलेल्या खोट्या दाव्यांबाबत तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली होती. मितुल त्रिवेदीने दावा केला होता की, तो चांद्रयान-२ चाही एक भाग होता. त्यानंतर चांद्रयान -३साठीदेखील इस्रोने त्याला बोलावले होते. त्याच्या दाव्यानुसार, त्याने चांद्रयान लँडरच्या मूळ डिझाइनमध्ये अनेक बदल केल्यामुळे हे लँडर यशस्वीपणे चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करू शकले.

हे ही वाचा:

कैदेत असलेल्या वाधवान बंधूंची शहराची सैर

रेल्वे यंत्रणांचे नुकसान करणाऱ्याला होणार १० वर्षांची शिक्षा

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमेचे महत्त्व

प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन आणि काही धातू

अनेक वृत्तवाहिन्यांवरही मितुलच्या मुलाखती दाखवल्या जात होत्या. मात्र तो इस्रोशी जोडलेला आहे, हे दाखवणारी कोणतीही कागदपत्रे तो सादर करू शकला नाही. त्याने तो स्वत: फ्रीलान्सर वैज्ञानिक असून बीकॉम असल्याचा दावा केला होता. त्याने तो स्वत: नासाशी जोडलेला असल्याचा दावाही केला होता. त्याचाही कोणताही पुरावा त्याच्याकडे सापडला नाही. सगळे दावे खोटे आढळल्यानंतर पोलिसांनी मितुलला अटक केली आहे.

Exit mobile version