अमृतसरमधील एका मंदिरावर नुकत्याच झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मुख्य आरोपी सोमवारी (१७ मार्च) सकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. गुरुसिदक सिंग असे चकमकीत ठार झालेल्या आरोपीचे नावे आहे. चकमकीत आरोपीला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर आरोपीचा अन्य साथीदार विशाल उर्फ चुई पळून जाण्यात यशस्वी झाला.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी राजासांसी परिसरात फिरत असल्याची विशिष्ट गुप्त माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी सीआयए आणि छेहरता पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले.
त्यानंतर कारवाई दरम्यान, पोलिसांनी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गाडी सोडून गोळीबार केला. आरोपींनी केलेल्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल गुरप्रीत सिंग यांच्या डाव्या हाताला गोळी लागली, तर दुसरी गोळी इन्स्पेक्टर अमोलक सिंग यांना लागली. तिसरी गोळी पोलिसांच्या गाडीला लागली. स्वसंरक्षणार्थ, इन्स्पेक्टर विनोद कुमार यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये आरोपी गुरुसिदक सिंग जखमी झाला.
या घटनेनंतर जखमी अधिकारी आणि आरोपी दोघांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे नंतर गुरसिदकचा मृत्यू झाला. या चकमकीत त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा :
स्वामी विवेकानंद यांच्या शिक्षणाने माझ्या जीवनदृष्टीचा पाया घातला
‘5G इनोव्हेशन हॅकाथॉन 2025’ची केंद्राकडून घोषणा
विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या; ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी कोल्हापुरात निघणार मोर्चा
दरम्यान, १५ मार्च रोजी पहाटे अमृतसरच्या खंडवाला परिसरातील ठाकूरद्वारा मंदिरावर ग्रेनेड हल्ल्याची घटना घडली होती. मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी मंदिरावर ग्रेनेड हल्ला केला. त्याचे सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आले होते. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की दोन तरुण मोटारसायकलवरून येतात आणि मंदिराबाहेर काही सेकंद उभे राहून एक तरुण मंदिराच्या दिशेने काहीतरी फेकतो. यानंतर हे तरुण घटनास्थळावरून पळून जाताच मंदिरात एकच मोठा स्फोट होतो.