ममता बॅनर्जींना शिवीगाळ करणाऱ्यांची ‘बोटे तोडा’

पश्चिम बंगालचे मंत्री उदयन गुहा यांची धमकी

ममता बॅनर्जींना शिवीगाळ करणाऱ्यांची ‘बोटे तोडा’

कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणाच्या निषेधार्थ देशभरात अजूनही संतापाची लाट असून ठीक-ठिकाणी निदर्शने काढली जात आहेत. या प्रकरणावरून सोशल मीडियावर ममता सरकारवर सर्व स्तरावरून टीका केली जात आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालचे मंत्री उदयन गुहा यांनी वादग्रस्त विधान करून थेट धमकी दिली आहे. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सोशल मीडियावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शिवीगाळ केली तर त्यांची ‘बोटे मोड’ले जातील, अशी धमकी त्यांनी दिली आहे.

महिला डॉक्टर बलात्कार-हत्याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केल्याबद्दल यापूर्वी एका तरुणाला अटक करण्यात आली होती. पोस्टमध्ये अपशब्द वापरल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता. साग्निक लाह असे त्याचे नाव असून तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात पोस्ट केली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही वेळातच या तरुणाला
टीएमसी समर्थकांनी बेदम मारहाण केली. यानंतर साग्निक लाहाच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करून त्याला शुक्रवारी रात्री अलीपुरद्वार जंक्शन येथून अटक करण्यात आली. तरुणाच्या अटकेवरून ममता सरकारला अनेकांनी धारेवर धरले आणि ममता सरकारची हुकूमशाही स्पष्ट दिसत असल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा :

धक्कादायक! अग्नीविराचा ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, ५० लाखांचे दागिने केले फस्त !

बांगलादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बोरिवलीत जनआक्रोश

नाशिकमध्ये दोन महिलांसह तीन बांग्लादेशींना अटक !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार रचना बॅनर्जीचा माफीनामा

 

दरम्यान, या प्रकरणावरून मुख्यमंत्री ममतांना टार्गेट केले तर बोटे मोडले जातील, अशी थेट धमकी पश्चिम बंगालचे मंत्री उदयन गुहा यांनी दिली आहे. रविवारी (१८ ऑगस्ट) एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. मंत्री उदयन गुहा म्हणाले की, कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणावरून जे कोणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे बोट दाखवत आहेत, सोशल मीडियावर त्यांना शिवीगाळ करत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, अशा लोकांची ओळख पटवून त्यांची बोटे मोडली जातील. अन्यथा हे लोक बंगालचे बांगलादेश बनवण्याचा प्रयत्न करतील, असे गुहा म्हणाले.

गेली आठवड्यात आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील तोडफोड हाताळल्याबद्दल मंत्र्याने राज्य पोलिसांचे कौतुक केले. मंत्री गुहा म्हणाले, पोलीस येथे बांगलादेश सारखी परिस्थिती होऊ देणार नाही. रुग्णालयाची तोडफोड केल्यानंतरही पोलिसांनी कोणावरही गोळीबार केला नाही. स्थानिकांच्या सहकार्याने आम्ही बंगालचे बांगलादेशात रूपांतर होऊ देणार नाही. दरम्यान, मंत्री गुहा यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत.

Exit mobile version