कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर देशभर संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनेवरून मुख्यमंत्री ममता यांच्याविरोधात भाजपकडून जोरदार निदर्शने आणि राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, भाजप पाठोपाठ आता काँग्रेसनेही ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाष्य करून डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत संशय व्यक्त केला आहे.
कोलकाता बलात्कार हत्याकांडाच्या विरोधात काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोलकाता येथे निदर्शने केली. यावेळी अधीर रंजन चौधरी यांनी काळे कपडे परिधान करून निषेध व्यक्त केला. या निदर्शनात काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचे झेंडे फडकावत घोषणाबाजी करत होते.
यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ‘आम्ही बंगालच्या लोकांच्या आणि मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांच्या आवाजात सहभागी आहोत. ते म्हणाले, स्वतः ममता बॅनर्जी यांना या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी असे वाटत नाही, कारण अनेक गुपिते उघड होतील, हे घडू नये असे त्यांना वाटते, त्यामुळे त्या निरर्थक गोष्टींवर भाष्य करून लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण लोक त्यांना सोडणार नाहीत, कारण हे एक जन आंदोलन बनले आहे.