क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!

क्रोएशियामधील भारतीय दूतावासाचे प्रमुख राजदूत राजकुमार श्रीवास्तव

क्रोएशियातही आता मल्लखांब रोवला!

सुमारे २५० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला अस्सल मऱ्हाठमोळा मल्लखांब आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात तर सुरु झालाच आहे, पण भारताच्याही जवळ जवळ प्रत्येक राज्यात जाऊन पोहोचला आहे, एवढंच नव्हे तर भारताच्या सीमारेषा ओलांडून आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका या पाचही खंडांमध्ये सुरू झाला आहे. अमेरिका, जर्मनी, मलेशिया, नेपाल, भूतान, जपान या देशांमध्ये मल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटना निर्माण झाल्या आहेत व त्या विश्व मल्लखांब महासंघाला संलग्न झाल्या आहेत. उरुग्वे व नायजेरिया या देशांनीही आता मल्लखांबात रस दाखविला आहे. आणखी बऱ्याच देशांमध्ये ही प्रक्रिया आता सुरु होते आहे. एकेकाळी एक उपेक्षित व दुर्लक्षित खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्लखांबाला आता ‘जगातील सर्वात वेगाने वाढणारा क्रीडा प्रकार’ म्हणून ओळखले जाते.

एप्रिल २०२२ मध्ये कझाखस्तान व आता ऑक्टोबर २०२२ मध्ये क्रोएशियामध्ये मल्लखांबाची कार्यशाळा घेतल्यानंतर ही गोष्ट अधिक प्रकर्षाने जाणवली. क्रोएशियाची राजधानी झाग्रेब येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ योगा अँड आयुर्वेदा’ या योग संस्थेचे प्रमुख, याद्रांको मिक्लेस, जे ‘वर्ल्ड मुव्हमेंट फॉर योगा अँड आयुर्वेदा’ या आंतरराष्ट्रीय संघटनेचे व ‘इंटरनॅशनल योग कॉन्फेडरेशन’चे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी २०१० मध्ये भोपाळ येथे महामुनी पतंजली यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मल्लखांब बघितला होता. त्यानंतर तब्बल १२ वर्षानंतर त्यांनी एका आंतरराष्ट्रीय ‘वेबिनार’मध्ये सप्टेंबर २२ मध्ये मल्लखांब विषयावर एक परिसंवाद ठेवला, क्रोएशियामधील भारतीय दूतावासाचे प्रमुख राजदूत राजकुमार श्रीवास्तव हे त्या ‘वेबिनार’च्या अध्यक्षस्थानी होते.

मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे विश्व मल्लखांब गुरु उदय देशपांडे यांनी या वेबिनार मध्ये मल्लखांबाची महती सांगितली व त्याच ‘वेबिनार’मध्ये मल्लखांबाची पहिली कार्यशाळा ऑक्टोबर मध्ये झाग्रेब येथे घेण्याचे नक्की झाले. झाग्रेबमधील विनोग्राद्स्का येथील ‘वेल्वेट पेपर स्टुडिओ’मध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये या कार्यशाळेचे आयोजन उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ६५ वर्षीय याद्रांको मिक्लेस यांच्या बरोबरच ४० ते ५० वर्षे वयोगटातील अनेक महिलांनी दोरी मल्लखांबाचे प्रशिक्षण घेतले. बहुतेक जणी योगसाधक असल्याने त्यांना हे सोपे गेले. दोरी मल्लखांबावरील बहुतेक सर्व स्थिरस्थिती – पद्मासन, पर्वतासन, पश्चिमोत्तानासन, शवासन, धनुरासन, निद्रासन, तसेच उलटे लटकण्याच्या स्थिती, वादी, रिकेब, बजरंग पकड, यासारखे प्रकारही त्यांनी अल्पावधीत आत्मसात करुन दाखविले.

हे ही वाचा:

म्हणून अरुण गवळी येणार तुरुंगाबाहेर!

विनयभंगप्रकरणी आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

हेमंत सोरेन चौकशीला या! ईडीने पाठवले दुसरे समन्स

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असले पाहिजे

 

मनोहर लाल, जे क्रोएशियातील भारतीय दुतावासात प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी या संपूर्ण मल्लखांब प्रशिक्षणात खूप सहकार्य केले. कार्यशाळेच्या समारोप समारंभाला ते सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतः दोरी मल्लखांबाचे प्रशिक्षणही घेतले. त्यांनी भारतातून लाकडी पुरायचा मल्लखांब क्रोएशियमध्ये आणणे, तिथे तसे मल्लखांब बनवून घेणे, लवकरात लवकर दुसरी मल्लखांब कार्यशाळा आयोजित करणे व २०२३ मध्ये भूतानमध्ये होणाऱ्या दुसऱ्या विश्व मल्लखांब स्पर्धेसाठी क्रोएशियाचा संघ तयार करणे याबाबत रूपरेषा तयार केली. खरोखरच याप्रमाणे योजना राबविली तर ती मल्लखांबासाठी खूप मोठी उपलब्धता ठरेल.

Exit mobile version