मलिकांना उमेदवारी नको म्हटलं, ऐकलं नाही, आता शिंदे गटाच्या उमेदवाराचे काम करू!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

मलिकांना उमेदवारी नको म्हटलं, ऐकलं नाही, आता शिंदे गटाच्या उमेदवाराचे काम करू!

महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. यावरून विरोधक सत्ताधारी नेत्यांवर टीका करत आहेत. भाजपवरही टीका केली जात आहे. यावर भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय जनता पार्टी त्यांचा प्रचार करणार नसल्याचे पक्षाने म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचार करणार नसल्याचे म्हटले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर करताच त्यांनी मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यानंतर विरोधकांनी टीका होताच भाजप नेते आशिष शेलार यांनी काल (२९ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत भाजपा नवाब मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देखील तोच प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आशिष शेलार यांनी ज्याप्रमाणे म्हटले, तशीच पक्षाची भूमिका आहे. राष्ट्रवादीला स्पष्ट सांगितले होते की, नवाब मलिक यांना विधानसभेचे तिकीट देवू नका. महायुतीमध्ये आम्ही त्यांचे काम करणार नाही, भाजपा त्यांच्यासोबत जाणार नाही. तरीही राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांना एबी फॉर्म दिला, ते उभे राहिले.

मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, भारतीय जनता पार्टी त्यांचे काम करणार नाही. मानखुर्दमध्ये शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे, जर शिंदे गटाने तो उमेदवार ठेवला तर भाजपा त्यांच्याच उमेदवाराचे काम करेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

घुसखोर रोहिंग्यांना हवा आहे शाळेत प्रवेश, पण…

उत्तराखंडमध्ये रेल्वे उलटवण्याचा कट; हरिद्वारहून डेहराडूनला जाणाऱ्या ट्रॅकवर सापडला डिटोनेटर

कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भारताविरुद्ध गुप्तचर माहिती फोडल्याची कबुली

सलमानला पुन्हा धमकी; अज्ञाताकडून दोन कोटींची मागणी

दरम्यान, मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या वतीने एकनाथ शिंदे गटाकडून सुरेश कृष्णा पाटील (बुलेट पाटील) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सुरेश कृष्णा पाटील विरुद्ध नवाब मलिक अशी लढत पहायला मिळणार आहे.

Exit mobile version