नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत

नागपूरच्या २० वर्षीय मालविकाने सायनाला केले पराभूत

नागपूरच्या एका २० वर्षीय बॅडमिंटनपटूने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवार, १३ जानेवारी रोजी सायना नेहवालवर विजय मिळवला. नागपूरची मालविका बनसोडने या स्पर्धेत लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिचा पराभव केला. या विजयासह मालविका हिने उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिच्यासह ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांनीही स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

२० वर्षीय मालविकाविरुद्धच्या लढतीत सायनाने १७-२१, ९-२१ अशी मोठी हार पत्करली. मालविका हिने ३४ मिनिटांत सायना हिचे आव्हान संपुष्टात आणले. सायना नेहवाल ही प्रदीर्घ कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टवर परतली होती, पण तिचा प्रवास लवकरच संपुष्टात आला. सायना सध्या जागतिक क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर, तर मालविका १११ व्या क्रमांकावर आहे.

सामना जिंकल्यावर मालविका हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सायना हिच्या सोबतचा सामना छान झाला. पहिल्यांदाच सायनाला आपण भेटल्याचे तिने सांगितले. तिच्या सोबत सामना खेळल्यामुळे अनुभव मिळाला असून ती माझ्यासाठी आदर्श आहे, असे मालविका म्हणाली. इतक्या मोठ्या स्पर्धेत तिच्यासोबत खेळायला मिळाले म्हणजे स्वप्न सत्यात उतरले अशा भावना तिने व्यक्त केल्या.

दरम्यान, पी.व्ही.सिंधूने सायनाला याआधी पराभूत केले होते. सिंधू ही पहिली तर मालविका ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे, ज्यांनी सायनाला महत्त्वाच्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभूत केले आहे. पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकची तेरेझा स्वाबिकोवा हिला दुखापत झाल्यामुळे सायना हिला थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला होता.

हे ही वाचा:

बिकानेर एक्स्प्रेसचे चार डबे घसरले; तीन जण दगावले

दाऊदचा भाचा सोहेल कासकर पाकिस्तानमध्ये निसटला

कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद

छगन भुजबळ अडचणीत; क्लीन चीटला उच्च न्यायालयात आव्हान  

भारताची आणखी एक स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनेही विजयासह पुढील फेरीत प्रवेश केला. तिने इरा शर्माविरुद्धचा दुसऱ्या फेरीचा सामना २१-१०, २१-१० असा जिंकला. तसेच अश्मिता चलिहा हिनेही दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला असून आता तिसऱ्या फेरीत अश्मिताचा सामना सिंधूशी होणार आहे.

Exit mobile version