कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. एक ट्रक आणि मिनी बसमध्ये हा भीषण अपघात झाला. हावेरी जिल्ह्यात ब्यादगी तालुक्यात शुक्रवारी एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली आणि या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हे सर्व भाविक तीर्थयात्रेवरून परतत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील सर्व भाविक हे शिवमोगाचे रहिवासी होते. ते देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथून परतत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला ही बस जाऊन धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; १६ लाखांचे होते बक्षीस
दिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून सहा जण जखमी
“मुंबई शिक्षक, पदवीधर निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला”
बस चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बस चालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.