कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील मैदाने, उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. विरंगुळा म्हणून नागरिकही मैदानांत आणि उद्यानात दाखल होत आहेत. मात्र पूर्व उपनगरातील महापालिकेच्या एम पूर्व विभागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगणाचे काम अद्याप रखडलेले आहे. मैदानाचे कार्यादेश निघूनही काम काहीच झालेले नाही. मग लाखो रुपये कोणाच्या खिशात गेले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणासंबंधी आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीलाही पालिकेकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याचे चित्र आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय या उद्यानाच्या कामासाठी २०१८- १९ साठी कंत्राटदाराला २५ लाख ६७ हजार ७०३ रुपये देण्यात आले होते; तर २०१९- २० या वर्षासाठी ३० लाख ३३ हजार ३५७ रुपये किमतीचे कार्यादेश देण्यात आले होते. त्यात उद्यानाचे सुशोभीकरण, सुरक्षा, झाडे लागवड, स्वच्छता इत्यादी कामांकरिता परीक्षण मोबदला देण्यात आला होता. या कार्यकाळात सदर कामाचे परीक्षण महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीत होते. मात्र या सर्व बाबी केवळ कागदावरच दिसत असल्याचे लक्षात येता स्थानिक नगरसेवक शहानवाझ शेख यांनी जुलै २०२१ मध्ये पालिकेकडे लेखी पत्राद्वारे विचारणा केली असता प्रशासकीय यंत्रणेने उत्तर देण्यासाठी वेळ मारून नेली.
हे ही वाचा:
अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस
केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या
कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण
मुंबई महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रत्यक्ष भेटून उद्यानाच्या कामांसंबंधी निवेदन देण्यात आले आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र त्यावरही काहीच हालचाल झाली नाही. २३ ऑगस्टला पालिका उपायुक्त रमाकांत बिरादर यांना भेटूनही निवेदन देण्यात आले. असा प्रकार घडणे धक्कादायक असल्यामुळे सर्व स्तरावरून आश्चर्य व्यक्त केले जात असून चौकशीची मागणी होत आहे.
चांगली उद्याने, मैदाने नागरिकांना देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. मात्र अशी कामे होत असतील तर नागरिकांच्या कररुपी पैशांचे नुकसान होत आहे, अशी टीका केली जात आहे. कार्यादेश निघूनही अजून मैदानाचे काम झालेले नाही त्यामुळे आता नगरसेवक स्वतः आंदोलनाच्या मार्गावर आहेत. संबंधित प्रकरणाचा छडा लावून गैरप्रकार उघडकीस आणावा, अशी मागणी केली जात आहे.