संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून सध्या चौकशीच्या गर्तेत अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे. आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोईत्रा यांना प. बंगालमधील नादिया जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे. त्यायोगे तृणमूल काँग्रेस त्यांच्या मागे समर्थपणे उभा असल्याचे संकेत पक्षनेतृत्वाने दिले आहेत.
तृणमूल काँग्रेसने सोमवारी प. बंगालमधील ३५ संघटनात्मक जिल्ह्यांतील अध्यक्षांची घोषणा केली. त्यात त्यांनी महुआ मोईत्रा यांना नवी जबाबदारी दिली आहे. मोईत्रा यांना कृष्णनगर (नादिया उत्तर) संघटनात्मक जिल्ह्याचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्या याआधी कृष्णनगर संघटनात्मक जिल्ह्याच्या अध्यक्ष होत्या. मात्र नुकत्याच केलेल्या फेरबदलात त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्यांना नवीन पद दिले आहे.खासदार महुआ मोईत्रा यांनी या नियुक्तीनंतर पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. आपण सदैव पक्षासोबत नादिया येथील लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहू, असे आश्वासन त्यांनी ‘एक्स’वर दिले आहे.
हे ही वाचा:
‘भारतात काय बदलले? उत्तर नरेंद्र मोदी आहेत’
‘मोदी म्हणजे रॉकेट, अन् उद्धव ठाकरे फुसकाबार!
अमेरिकेमध्ये पॅलिस्टिनी समर्थक विद्यार्थ्याकडून वर्गामध्ये अडथळा!
कर्नाटकमध्ये तीन मुलांसह मातेची भोसकून हत्या
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून मोईत्रा यांची विनोद सोलकर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय नैतिकता समितीने चौकशी केली. या चौकशीत समितीच्या बहुतेक सदस्यांनी मोईत्रा यांच्या निलंबनाची शिफारस केली आहे. तसेच, हा अहवाल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना सुपूर्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने मोईत्रा यांना हे पद दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. अर्थात मोईत्रा यांनी त्यांच्यावरील हे सर्व आरोप फेटाळले आहेत.