देशाच्या संसदेत बेकायदेशीरपणे घुसून संसदेत धुराचे डबे फोडून देशात खळबळ उडवून दिल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता महेश कुमावत याला आज अटक केली आहे. लोकसभेवर हल्ला करण्याच्या कटात महेश कुमावत याचा सहभाग होता, याला दिल्ली पोलिसांनी दुजोरा दिला आहे. महेश कुमावत याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. संसदेवर ज्या दिवशी हल्ला तेव्हा महेश कुमावत हा दिलीमध्येच होता.
या हल्ल्याचा सूत्रधार ललित झा हा राजस्थानमध्ये लपून बसला होता. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश कुमावत हा नीलम देवी हिच्या संपर्कात होता. संसदेत धुराचा डबा फोडला तेव्हा संसदेच्या बाहेर यांची निदर्शने केली होती. या प्रकरणात महेश कुमावत याचा चुलत भाऊ कैलास याचीही दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. अटक करण्यात आलेल्या आरोपींना देशात अराजक माजवायचे होते, हाच त्यांचा यामागचा उद्देश होता असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.