महेश कोठारे यांना पितृशोक अंबर कोठारे यांचे निधन.

वृद्धापकाळाने मुंबईत निधन

महेश कोठारे यांना पितृशोक अंबर कोठारे यांचे निधन.

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे आणि मराठी चित्रपटांचे बादशाह महेश कोठारे यांचे वडील  यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबर कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.

अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला.त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कोठारे यांना वेगवेगळी कामे करावी लागली. दिवाळीच्या काळात गिरगावात रस्त्यावर उटणे विकण्याचेही काम त्यांनी काही काळ केले होते. कालांतराने शिक्षण पूर्ण करून ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’ या बॅंकेत त्यांनी नोकरी केली. तब्बल चार दशके त्यांनी या बॅंकेत वेगवेगळ्या पदांवर काम केले. या बॅंकेचे भारतातर्फे प्रतिनिधीत्व करण्याचीही संधी त्यांना मिळाली होती. अंबर कोठारे म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते.

नोकरी सांभाळत त्यांनी आपली रंगभूमीची आवडदेखील जोपासली. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घ काळ काम केले. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे त्यांनी बरीच नाटके रंगभूमीवर सादर केली. ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते.

काही नाटकांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला होता. ‘झुंजारराव’ या नाटकामधील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी काही उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकाच्या लेखनासाठी कोठारे यांनी प्रख्यात लेखक दत्ता भट यांना नाशिकवरून मुंबईत खास निमंत्रित केले होते. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांना बालकलाकार म्हणून घडवण्यात आणि कालांतराने निर्माता-दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे खूप मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर मेहनत घेतली होती.
त्यानंतर महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’ या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या इतरही काही महत्त्वाच्या कलाकृतीं मध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

Exit mobile version