महाराष्ट्राच्या एनसीसीला पंतप्रधान बॅनरचा मान

महाराष्ट्राच्या एनसीसीला पंतप्रधान बॅनरचा मान

महाराष्ट्राच्या राष्ट्रीय कॅडेट कोरच्या संचलनालयाला यंदाचा पंतप्रधान बॅनर देऊन गौरविण्यात आले आहे. संरक्षण संचालनालयाने ही माहिती एका निवेदनाद्वारे शुक्रवारी दिली.

याआधी २०१४मध्ये महाराष्ट्राने पंतप्रधानांचा बॅनर जिंकला होता. विविध राज्यांतील १७ एनसीसी संचलनालयाचे कॅडेट्स यावेळी महिनाभर चाललेल्या प्रजाकसत्ता दिन शिबिरात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या एनसीसी दलात मुलगे आणि मुली मिळून ५७ कॅडेट्सचा समावेश होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून हे कॅडेट्स राजपथवर गेले होते.

शुक्रवारी करिअप्पा परेड ग्राऊंडवर झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रतिष्ठेचा बॅनर महाराष्ट्राच्या एनसीसी संचलनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांना बहाल केला. सिनियर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधवने हा बॅनर स्वीकारला तर कॅडेट कॅप्टन निकिता खोतने ट्रॉफी स्वीकारली.

तब्बल ८ वर्षांनंतर महाराष्ट्र एनसीसीला हे यश मिळाले. २००२ ते २०१३ दरम्यान सलग सहा वेळा महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने विजेतेपद मिळविले होते. नंतर २०१९ पर्यंत महाराष्ट्राला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. २०२०, २०२१ मध्ये महाराष्ट्राला उपविजेते मिळाले. आता पुन्हा महाराष्ट्राच्या गळ्यातच विजेतेपदाची माळ पडली आहे.

हे ही वाचा:

शेतात आले दागिन्यांचे पीक!

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने केली आत्महत्या

महेश मांजरेकर यांच्याविरोधात दोन फौजदारी तक्रारी

केरळ सरकारने तिला हिजाब घालण्यास केली मनाई! काय आहे प्रकरण…

 

पंतप्रधान मोदींनी या बॅनर प्रदान सोहळ्यात एनसीसी कॅडेट्सना संबोधित केले. पंतप्रधान यावेळी म्हणाले की, आता मुलींची संख्या एनसीसीमध्ये वाढते आहे. मी सुद्धा एनसीसीमध्ये होतो आणि त्याचा मला अभिमान वाटतो. आता एनसीसीला अधिक बळकट करण्यासाठी आपले सरकार सर्व पावले उचलत आहे. एनसीसीमध्ये होत असलेला हा बदल संपूर्ण देश बघत आहे,
गेल्या दोन वर्षात सीमाभागातील जवळपास २ लाख विद्यार्थ्यांचा एनसीसीमध्ये समावेश झाला आहे. देशाच्या तळागाळापर्यंत एनसीसी पोहोचत आहे. एनसीसीतील युवकांकडे देशाचे भवितव्य बदलण्याची क्षमता आहे. पण अंमली पदार्थांचे सेवन तरुणांसाठी विष ठरत आहे, त्यांची आयुष्ये त्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. आपण सर्वांनी याविरोधात लढले पाहिजे.

प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यावर पंतप्रधान मोदींनी एनसीसीच्या कॅडेट्सच्या संचलनाचे निरीक्षण केले. एनसीसी कॅडेट्सनी संचलन करत पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एनसीसीच्या कॅडेट्सचा गौरव पदक केला.

Exit mobile version