महाराष्ट्रात माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी अशी अनेक हिल स्टेशन्स प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात सुट्टी काढून या पर्यटन स्थळांना भेट देणे हे अनेकांसाठी नित्यक्रम असतो. पण आता हवामानात असे काही बदल होताना दिसत आहेत की थेट शहरात एखाद्या हिल स्टेशनसारख्या धुक्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या विविध भागात धुक्याचा अनुभव येत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ‘फॉग चल रहा है’ अशा प्रकारचा अनुभव नागरिकांना येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये धुक्याची चादर अनुभवायला मिळाली. शनिवार ४ डिसेंबर आणि रविवार ५ डिसेंबर असे दोन दिवस नागरिकांना हे धुके पाहायला मिळाले आहे. त्यामुळे विकेंडला घरबसल्या नागरिकांना हिल स्टेशनचा अनुभव आला आहे.
हे ही वाचा:
१२ जणींना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्याला घातल्या बेड्या
भारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य
राज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण
डिसेंबरच्या सुरवातीला महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर आता धुक्याची चादर ओढली गेली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा विविध सोशल मीडिया साईट्सवर नेटकऱ्यांकडून या धुक्याचे फोटो शेअर केले जात आहेत. तर त्यासोबतच अनेक मनोरंजक अशी कॅप्शन्स आणि कमेंट्स बघायला मिळत आहेत.
दरम्यान या धुक्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे समजते. मुंबई येथून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्या आणि काही लोकल्स या उशिराने धावताना आढळल्या. या मागचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरीही धुक्याच्या कारणामुळेच या गाड्या उशिराने धावत असल्याचे म्हटले जात आहे.