महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, गुरुवारी जाहीर केला. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल असून कोकणचा निकाल ९६.०१ टक्के आहे. तर मुंबई विभाग निकालत तळाशी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी ८८.१३ टक्के इतका घसरला आहे.
राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी राज्यातून १४ लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के (नियमित) विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे.
सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९६.०९ टक्के असून कला शाखेचा निकाल ८४.०५ टक्के, वाणिज्य ९०.४२ टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८९.२५ टक्के इतका लागला आहे.
हे ही वाचा:
बिजू जनता दलाचे ठरले! संसद भवन कार्यक्रमाला उपस्थित राहणार
मोदी म्हणाले, परदेश दौऱ्यात तिथले विरोधकही आपल्या देशासाठी कार्यक्रमांना उपस्थित होते!
किरकोळ शरीरयष्टीचा चोर गज वाकवून कोठडीतून पळाला!
मंदिरांवर हल्ले झाले तर भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना धक्का पोहोचेल!
विभागनिहाय टक्केवारी
राज्यात पुणे विभागाचा निकाल ९३.३४ टक्के, नागपूर ९०.३५ टक्के, औरंगाबाद ९१.८५ टक्के, मुंबई ८८.१३टक्के, कोल्हापूर ९३.२८ टक्के, अमरावती ९२.७५ टक्के, नाशिक ९१.६६ टक्के, लातूर ९०.३७ टक्के आणि कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के इतका आहे.