६३,२९४ नव्या रुग्णांसह महाराष्ट्राने नोंदवला रुग्णवाढीचा नवा उच्चांक

६३,२९४ नव्या रुग्णांसह महाराष्ट्राने नोंदवला रुग्णवाढीचा नवा उच्चांक

रविवार, ११ एप्रिल रोजी भारताने कोरोना रुग्णवाढीत दिड लाखांचा टप्पा पार केला. गेल्या अनेक दिवसांप्रमाणे रविवारीही महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. रविवारी देशात एकूण १,५२,८७९ इतके नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले तर महाराष्ट्रात ६३,२९४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यात रविवारी ३४९ जणांनी कोविडमध्ये आपले प्राण गमावले.

देशातील ही कोरोना परिस्थिती लक्षात घेता रविवारी भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तर महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या दृष्टीने चर्चा सुरु झाल्या आहेत. रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कोविड टास्क फोर्सची एक बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून ही बैठक घेतली गेली. या बैठकीत महाराष्ट्रातील कोरोनाच्या सद्य स्थितीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती ही हाताबाहेर गेली आहे. तेव्हा महाराष्ट्रात लॉकडाऊन लावावा का? यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री, टास्क फोर्सचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’

लॉकडाउनचा पेच, संभ्रमाचा चक्रव्यूह

परभाव टाळण्यासाठी पंढरपूरमध्ये पुन्हा भिजण्याचे प्रयोग

‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’

या बैठकीत टास्क फोर्समधील तज्ज्ञांकडून लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टिने मत मांडले गेले. कोरोना साखळी तोडायची असल्यास १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावावा लागेल असे मत तात्याराव लहानेंकडून मांडण्यात आल्याचे समजते. तर नव्या स्ट्रेनच्या दृष्टीने उपाय योजना कराव्या लागतील असेही मत उमटले. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याच पद्धतीची मते मांडली होती. त्यामुळे टास्क फोर्समधील डॉक्टर्सनी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळलेला दिसत आहे.

Exit mobile version