मागण्या पूर्ण करा नाहीतर कामबंद; ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा पवित्रा!

मागण्या पूर्ण करा नाहीतर कामबंद; ‘मार्ड’च्या डॉक्टरांचा पवित्रा!

महाराष्ट्र निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने (MARD) राज्य सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला होता. वारंवार आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्यामुळे डॉक्टरांनी काम बंदचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामध्ये राज्यातील पाच हजारांहून अधिक डॉक्टर सहभागी होणार आहेत.

कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी शैक्षणिक फी माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, या निर्णयासंबंधी पुढे कोणतीही पावले उचलली गेली नसल्यामुळे ‘मार्ड’ने राज्य सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला होता.

हे ही वाचा:

‘गुलाब’ चक्रीवादळामुळे १६ जणांनी गमावले प्राण; जनावरे, घरांचेही झाले मोठे नुकसान

…असा उठवला सीएने आपल्या नावाचा फायदा! वाचा…

पालिका कर्मचारीच मागत होता फेरीवाल्यांकडून १०-१० रुपये…वाचा!

कोरोनाऐवजी दिली रेबीजची लस; कळव्यातली धक्कादायक घटना

१ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे, असे सेन्ट्रल ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले. या आंदोलनात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे एम. डी., एम. एस. आदी डॉक्टरही सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय बेमुदत काम बंद आंदोलन असले तरीही डॉक्टर आपली सेवा बजावत राहणार आहेत. गंभीर, अतिदक्षता आणि आपत्कालीन विभागातील रुग्णांवर उपचार सुरू ठेवले जाणार आहेत, असे सेन्ट्रल ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी डॉक्टरांसोबत झालेल्या बैठकीत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. सेंट्रल ‘मार्ड’च्या पूर्वी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ‘मार्ड’च्या निवासी डॉक्टर संपाच्या तयारीबाबत निर्णय घेण्यात आला होता आणि राज्यसरकारला याबाबत स्मरणपत्र देण्यात आले होते.

Exit mobile version