देशाची कोरोना कॅपिटल बनलेल्या महाराष्ट्रात शनिवार, १ मे रोजी ६३,२८२ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर भारताने रुग्णवाढीच्या बाबतीत चार लाखांचा आकडा पार केला आहे. देशात आजवरची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली. ४,०१,९९३ हा भारताचा रुग्णवाढीचा आकडा आहे.
देशभरात सध्या कोरोनाचा प्रलय सुरु आहे. त्यात सर्वाधिक होरपळून महाराष्ट्र निघत आहे. शनिवारी महाराष्ट्रात ६३,२८२ नवे कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ३९०८ रुग्ण हे राजधानी मुंबईत आढळले तर ४०६९ रुग्ण हे पुण्यात आढळले. शनिवारी महाराष्ट्र्रात ६१,३२८ जण कोरोनावर मात करून स्वगृही परतले, तर ८०२ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात ६,६३,७५८ एवढे रुग्ण कोरोनाच्या कचाट्यात आहेत.
हे ही वाचा:
चक्क एकाच प्रवाशासाठी विमानाचे उड्डाण
भारत आयात करणार रेमडेसिवीरचे डोसेस
भारतातील दर दहापैकी एका रुग्णाला रिलायन्स निर्मित प्राणवायूचा पुरवठा
दरम्यान शनिवारपासून राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. या वयोगटातील ११,४९२ लोकांचे पहिल्या दिवशी लसीकरण करण्यात आले. राज्यातील एकूण २६ जिल्ह्यांमध्ये ही लसीकरण मोहीम घेण्यात आली. लवकरच राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबवली जाईल असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. यापैकी सर्वाधिक लसी या पुण्यात देण्यात आल्या. पुणे जिल्ह्यात १३१६ जणांचे लसीकरण केले गेले. तर त्या खालोखाल मुंबईत १००४ लोकांचे लसीकरण झाले.