बुधवारी महाराष्ट्राने कोरोना रुग्णसंख्या वाढीचा नवा उच्चांक गाठला आहे. बुधवारी महाराष्ट्रात चोवीस तासांत ३१,८५५ नवे रुग्ण वाढले. कोविड महामारी सुरु झाल्यापासूनची ही आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती दिवसागणिक अधिकच चिंताजनक होत असून राज्याचा प्रवास पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास करतोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.
बुधवारी महाराष्ट्रात नोंदवल्या गेलेल्या रुग्णवाढीनंतर महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा २,४७,२९९ वर गेला आहे. बुधवारी महाराष्ट्रात ९५ जणांचा मृत्यू झाला असून १५,०९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राजधानी मुंबईतही बुधवारी आजवरची सर्वात जास्त चोवीस तासातली रुग्णवाढ दिसून आली. हा एकदा पाच हजारच्या पार आहे. बुधवारी मुंबईत ५१८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
हे ही वाचा:
मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले
महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबत केंद्र सरकारतर्फेही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात कोविड रुग्णांची जी वाढ होत आहे त्यात महाराष्ट्र राज्य क्रमांक पहिला आहे. महाराष्ट्रात रोज कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक होताना दिसत आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे जिल्हा क्रमांक एक ला आहे. पुणे व्यतिरिक्त नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांव्यतिरिक्त कर्नाटकातील बंगलोर अर्बन जिल्ह्याचा सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.
बुधवारी महाराष्ट्रात बीड, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रात्री १२ वाजल्यापासून हा लॉकडाऊन लावला जाणार आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यांत लॉकडाऊनचा कालावधी दहा दिवसांचा असणार आहे. तर परभणीत आठवडाभराचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.