चांद्रयान-३ च्या यशस्वी भरारीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा!

यानाचे महत्त्वाचे भाग महाराष्ट्रातील कंपन्यांनी पुरवले

चांद्रयान-३ च्या यशस्वी भरारीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा!

भारताचे ‘चांद्रयान- ३’ यान शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी २.३५ मिनिटांनी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले. त्यानंतर या यानाचा आता चंद्रापर्यंतचा ४० दिवसांचा प्रवास सुरु झाला आहे. देशासह साऱ्या जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेकडे आहे. भारताची चांद्रयान- ३ ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. चांद्रयान- ३ हे २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.

भारताच्या चंद्र मोहिमेत महाराष्ट्राच मोठं योगदान आहे. चांद्रयान- ३ चे महत्त्वाचे भाग मुंबईतील गोदरेज एअरोस्पेसमध्ये बनवण्यात आले आहेत, तसेच बुलढाणा येथील चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर चांद्रयान- ३ मध्ये करण्यात आला आहे. तर पुण्याच्या जुन्नरमधील दोघांनी  चांद्रयान मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये बनले चांद्रयानाचे भाग

भारताच्या चांद्रयान- ३ मोहिमेच्या यानासाठी गोदरेज समूहाच्या गोदरेज एरोस्पेस कंपनीने इस्रोला इंजिनासह काही महत्त्वपूर्ण भाग पुरवले आहेत. हे महत्त्वाचे भाग मुंबईतील विक्रोळी प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहेत. गोदरेज कंपनीने अंतराळ प्रकल्पांसाठी लिक्विड प्रोपल्शन इंजिन, सॅटेलाइट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल या भागांसह इंजिनचे काही भाग पुरविले आहेत. यापूर्वी गोदरेजने मंगळयान मोहिमेतही महत्त्वाचे योगदाने दिले होते.

बुलढाण्यातील चांदीचा चांद्रयानात वापर

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील प्रसिद्ध असलेली चांदी आणि फॅब्रिक्सचा वापर चांद्रयान- ३ मोहिमेत करण्यात आला आहे. वजनाने हलक्या असलेल्या चांदीचा चांद्रयान- ३ मध्ये वापरण्यात आली आहे. यानाच्या स्टर्लिंग ट्यूबमध्ये चांदी वापरण्यात आली आहे. खामगाव येथील विक्रमशी फॅब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने चांद्रयान- ३ साठी लागणारे थर्मल शील्ड पुरवलं आहे.

हे ही वाचा:

कॅनडामधील भगवत गीता पार्कमध्ये फुटीरवाद्यांकडून तोडफोड

फ्रान्सवरून पंतप्रधान मोदी युएईला रवाना

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

पुण्यातील दोन सुपुत्रांची महत्त्वाची कामगिरी

इस्रोच्या या मोहिमेत पुण्यातील असिफभाई महालदार आणि मयुरेश शेटे यांचे मोलाचे योगदान आहे. असिफभाई महालदार हे रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीत कार्यरत असून मयुरेश शेटे हे इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत. मयुरेश शेटे हे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. तर, असिफभाई महालदार हे उद्योजक असून त्यांच्या कंपनीला या मोहिमेसाठी सहा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मोहिमेदरम्यान काही धोका झाला तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात ठेवावी लागते. ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीने पुरवली होती.

चांद्रयान- ३ मध्ये वापरण्यात आलेले चार बूस्टर पुण्यातील वालचंदरनगर कंपनीने तयार केले आहेत. या बूस्टरमध्ये घनस्वरुपात इंधन भरले जाते. मोहिमेच्या पहिल्या स्टेजसाठी याचा उपयोग होतो.

Exit mobile version