भगवान प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत प्रभू रामलला यांची प्राणप्रतिष्ठा नुकतीच झाली. त्यानंतर केंद्रातील सर्व मंत्री फेब्रुवारीमध्ये अयोध्येत प्रभू रामलला यांचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंत्री तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती तिथे गेल्याने त्रास होऊ शकतो त्यामुळे फेब्रुवारीमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सबंध मंत्रिमंडळ सुद्धा फेब्रुवारीच्या ५ तारखेला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनानंतर आता त्यांचे जाणेही अनिश्चित काळासाठी पुढे गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, फेब्रुवारीमध्ये प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ नये. सध्या दर्शन घेण्यासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. प्रचंड गर्दी तिथे झाली आहे. अशात जर मंत्री तिथे गेले तर त्यांचा प्रोटोकॉल आणि इतर सुरक्षेच्या संदर्भातील बाबी लक्षात घेता तिथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ शकते. तेव्हा मंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये अयोध्येत न जाता मार्चमध्ये जावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
हेही वाचा..
मालदीवमधून लष्कर माघारी बोलावण्याचे कोणतेही आदेश नाहीत!
मनोज जरांगेच्या भगव्या वादळाला मुंबई पोलिसांचा लगाम!
अभिनेत्री रेवती म्हणाली, ‘आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, हे पहिल्यांदाच मोठ्याने बोललो’
आता हे आवाहन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केले असले तरी त्याच अनुषंगाने ते महाराष्ट्रातील मंत्र्यांनाही लागू पडते. सर्व मंत्रीमंडळ हे अयोध्येला जाण्याच्या तयारीत होते. तसे वृत्तसुद्धा प्रसार माध्यमामध्ये आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनानंतर आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. प्रोटोकॉल आणि सुरक्षा या कारणास्तव हा दौरा अनिश्चित काळासाठी पुढे जाणार आहे.