27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषदसऱ्याआधीच महाराष्ट्राच्या खोखो संघांनी लुटले सोने

दसऱ्याआधीच महाराष्ट्राच्या खोखो संघांनी लुटले सोने

Google News Follow

Related

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी सुवर्णविजेती कामगिरी केली. त्यामुळे दसऱ्याआधीच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सोने लुटल्याची भावना व्यक्त होत आहे. पुरुष गटात महाराष्ट्राच्या संघाने केरळवर ३०-२६ असा चार गुणांनी विजय मिळविला तर महिलांनी ओदिशावर डावाने विजय मिळवित सुवर्णपदक जिंकले.

संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्राने ओडिशावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८-८ असा एक डाव व १० गुणांनी ओडिशाचा पराभव केला. महाराष्ट्राकडून रुपाली बडेने ३ मि. संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपीने २:५० आणि ३:५० मि. पळतीचा खेळ केला आणि २ गुण मिळवत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका इंगळेने १:५० मि. संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला. तसेच तिने ८ गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोडने २:५० मि. संरक्षण केले. रुपाली बडेने ३ मि. पळतीचा खेळ करुन सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतारने १:४०  मि. संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने १:२० मि. नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.

पुरुष गटात महाराष्ट्राने केरळ विरुद्ध आक्रमक खेळ करत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्राने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मि. राखून व ४ गुणांनी (३०-२६) विजय साकारत सुवर्ण पदक पटकावले.

महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरेने २ मि. व १:१० मि. संरक्षण केले. रामजी कश्यप याने १:३० मि. व २ मि. पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्चावडेने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने १:४० व १:३० मि. पळतीचा सुरेख खेळ केला व ६ गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने १:२० मि. संरक्षण केले व १४ गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकरने १:२० मि. पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गवसने ४ गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

शीतल भोर म्हणते, यापेक्षा मोठा आनंद कुठला? 

महाराष्ट्रातील तमाम खोखो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमीनिमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही. अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही सुवर्ण जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया महिला खोखो संघाची कर्णधार शीतल भोर हिने व्यक्त केली.

शीतल भोर म्हणाली की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी खोखो संघाचा १५ दिवसांचे सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरात अधिक प्रभावी पद्धतीने सराव करुन घेण्यात आला. तसेच आम्हाला अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संघात दर्जेदार व अनुभवी खेळाडू असल्याने आमचा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होताच. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी आमचे मनोबल वाढवले. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आम्ही मिळवलेले हे सुवर्णपदक आहे, असे शीतल भोर हिने सांगितले.

सुवर्ण जिंकण्याचेच ध्येय होते :  ह्रषिकेश मुर्चावडे

संघात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू असल्याने आमचा संघ विजेतेपदाचा दावेदार होता आणि आम्ही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत गोल्ड जिंकले याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रशिक्षक शिरीन गोडबोले सरांनी कशापद्धतीने खेळ करावयाचा हे सांगितले होते. त्यानुसार आमचा स्पर्धेतील खेळ झाला आणि सुवर्ण पदकावर आम्ही शिक्कामोर्तब केले. विजयादशमीची खोखो आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आम्ही सुवर्णपदकाची भेट देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही असे ह्रषिकेश मुर्चावडे याने सांगितले.

हे ही वाचा:

नवरात्री २०२२ : विशालाक्षी शक्तीपीठ

अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण तुरुंगवासातून सुटका नाहीच

संजय राऊतांचा दसराही तुरुंगातच जाणार

पोलीस महासंचालकांच्या हत्येची पीएएफएफ दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

 

महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांची स्पर्धेपूर्वीची तयारी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक सामन्यात त्यांनी गाजवलेले वर्चस्व पाहता दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील याची मला खात्री होती, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी व्यक्त केली.  महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत दोन्ही संघ अप्रतिम खेळले आहेत. जवळपास प्रत्येक सामने त्यांनी डावाने वा अधिक फरकांनी जिंकले आहेत. साहजिकच  अंतिम सामन्यात दोन्ही संघ सुवर्ण पदक जिंकतील याची खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघ अंतिम सामन्यात जबरदस्त खेळले आणि सुवर्ण पदक जिंकले, अशी प्रतिक्रिया भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचा महिला खोखो संघ :  प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, शीतल भोर, श्वेता वाघ, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, रुपाली बडे, आरती कांबळे, गौरी शिंदे, पूर्वा मडके, जान्हवी पेठे, मयुरी पवार, दीपाली राठोड, संपदा मोरे. कोच – प्रवीण बागल, व्यवस्थापक रत्नराणी कोळी, कोच प्राची वाईकर.

महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ :  राहुल मंडल, सागर पोतदार, अविनाश देसाई, मिलिंद कुरपे, अक्षय भांगरे, रामजी कश्यप, ह्रषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, सुरज लांडे, अक्षय मिसाळ, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, धीरज सेनगर, निहार दुबळे, विजय शिंदे. कोच – शिरीन गोडबोले, संघ व्यवस्थापक कमलाकर कोळी, डॉ. अमित रावटे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा