मुंबईत वाढले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, तर महाराष्ट्राचा आकडा चाळीस हजार पार

मुंबईत वाढले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण, तर महाराष्ट्राचा आकडा चाळीस हजार पार

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरूच असून रविवारी राज्याने आजवरची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली. रविवारी भारतात एका दिवसात ४०,४१४ नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर राजधानी मुंबईत ६९२३ नवे कोरोना रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती दर दिवशी अधिकच गंभीर होत चलली आहे.

आजच्या घडीला भारतातील एकूण कोरोना रुग्णांपैकी अंदाजे साठ टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागत आहे तर जागत महाराष्ट्र चौथा आहे. देशातल्या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही वाढताना दिसत आहे. रविवारी राज्यात १०८ जणांनी कोरोनामुळे आपले जीव गमावले आहेत.

हे ही वाचा:

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

लॉकडाऊनच्या तयारीला लागा…मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

दरम्यान रविवारीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या प्रशासनाला लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. नागरिक हे नियमांचे पालन करताना दिसत नाहीयेत. अशा परिस्थितीत राज्यातील परिस्थिती आणखीनच चिंताजनक होऊ शकते अशावेळी प्रशासनाने लॉकडाऊनच्या दृष्टीने नियोजनासाठी सुरुवात करावी असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड टास्क फोर्स आणि राज्याचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत त्याविषयी चिंता व्यक्त केली. राज्यातील जनता नियम पाळत नसून यामुळेच राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे असे मत उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत उपस्थित केले. हे असेच चालू राहिले तर राज्यात लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध आणावे लागतील असे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. त्यामुळे त्यासाठीचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Exit mobile version