रमजान ईदच्या दिवशी राज्यात मशीद आणि मैदानांमध्ये सामूहिक नमाज पठणाला बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या अनुषंगाने हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे जनतेला आपल्या घरी राहूनच ईद साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने काढलेल्या नव्या आदेशात असे म्हटले आहे की ईदच्या दिवशी नमाज आणि इफ्तारसाठी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये.
देशात सध्या कोरोनाचा हाहाकार सुरु असून महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात वरती आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन लावलेला आहे. या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. यात कुठल्याही कारणाने जमावास एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यात धार्मिक सण-उत्सव यांचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
काँग्रेस पक्ष कांगावखोर, कद्रू, नकारात्मकता पसरवणारा
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीसांचा सवाल
अनिल देशमुखांची मुलेही ईडीच्या रडारवर?
मराठा आरक्षण केंद्रावर ढकलण्याची प्रक्रिया सुरू
याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारतर्फे ईदसाठीचे निर्बंध जाहीर केले आहेत. गृह विभागाचे उप सचिव संजय खेडकर यांनी ईदसंबंधी आदेशाचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्राकात ईदच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या धर्मीक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कारणाने लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. सामान खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वेळेतच खरेदी करता येणार आहे. ईदच्या दिवशी राज्याच्या ‘ब्रेक द चेन’ नियमांचा फज्जा उडू नये यासाठी सरकारकडून हे आदेश काढण्यात आले आहेत. तेव्हा मुस्लिमबहुल भागात या नियमावलीचे कितपत पालन केले जाते याकडे लक्ष देण्याची गरज असणार आहे.