जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढत चालला आहे. साऊथ आफ्रिकेतील या नव्या व्हेरियंटने युरोप आणि आफ्रिका खंडात थैमान घातले आहे. अशातच भारतातही या नव्या व्हेरियंटच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नसून महाराष्ट्र सरकारने नव्या कोविड व्हेरियंटचा धोका लक्षात घेता नवी कोविड प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे.
शनिवार, २७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे या नव्या कोविड संदर्भातील प्रतिबंधात्मक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या नवीन नियमावलीनुसार कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांनाच केवळ सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांचा वापर करता येणार आहे.
त्यामुळे आता लोकल प्रवासासोबतच इतर सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांचा वापर करण्यासाठी देखील कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण असणे अनिवार्य असणार आहे. हॉटेल, मॉलसारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक असणार आहे. तर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक असेल अन्यथा ७२ तासांमधील आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट अनिवार्य असणार आहे.
हे ही वाचा:
जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?
गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी
नव्या नियमावलीनुसार नाट्यगृह, चित्रपटगृह अथवा इतर सभागृहांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. तर उघड्यावर होणाऱ्या कार्यक्रमात एकूण क्षमतेच्या तुलनेत २५% प्रेक्षकांनाच परवानगी असणार आहे.
हे नियमावली न पाळणाऱ्या सर्वांवरच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नियम न पाळणाऱ्या व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तर नियमाची अमंलबजावणी ज्यांनी करून घेणे अपेक्षित आहे त्यांनी तसे न केल्यास १०,००० रुपयांचा दंड हा आस्थापनेला ठोठावण्यात येणार आहे. तर मॉलसारख्या सार्वजनिक ठिकाणी नियमावली पाळली न गेल्यास ५०,००० रुपयांचा दंड मॉलच्या मालकांना ठोठावला जाणार आहे.