महाराष्ट्राच्या मुलींची कुमारी गट खोखोत ‘नऊ’लाई, मुलांचे १८वे विजेतेपद!

वैभव मोरे वीर अभिमन्यू तर सानिका चाफे जानकी पुरस्काराची मानकरी

महाराष्ट्राच्या मुलींची कुमारी गट खोखोत ‘नऊ’लाई, मुलांचे १८वे विजेतेपद!

महाराष्ट्राच्या कुमार व मुलींनी कुमार गटाच्या ४२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट संपादन केला. कुमार गटाचे हे १८वे तर मुलींचे ९वे सलग अजिंक्यपद आहे. सलग नवव्यांद महाराष्ट्राच्या कुमार व मुली दुहेरी मुकुटाचे मानकरी ठरले असून कुमार मुलांचे सलग १८वे तर मुलींचे सलग ९ वे अजिंक्यपद ठरले आहे. हे कुमारांचे ३४ वे तर मुलींचे २५ वे राष्ट्रीय अजिंक्यपद आहे.

महाराष्ट्राचा कर्णधार वैभव मोरे ( ठाणे) वीर अभिमन्यू तर सांगलीची सानिका चाफे जानकी पुरस्काराची मानकरी ठरली.बेमेतरा (छत्तीसगड) येथील अलॉन्स पब्लिक स्कूल बिजाभटच्या मैदानावर शनिवारी सकाळी झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींची ओडिशावर २०-१८ अशी मात करताना चांगलीच दमछाक झाली. मध्यंतरापर्यंत ६-१० अशा चार गुणांनी पिछाडीवर असलेल्या ओडिशाच्या आक्रमकानी महाराष्ट्राच्या संरक्षकांची चांगलीच दमछाक केली. पहिल्या डावात ६ गडी बाद करणाऱ्या ओडिसाच्या आक्रमकानी दुसऱ्या डावात महाराष्ट्राचे १२ गडी बाद करीत सामन्यात चुरस निर्माण केली होती. अखेर निर्णय डावात महाराष्ट्राने आपला विजय खेचून आणला.

महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे हिने ४.२०, २.४० मिनिटे संरक्षण व ६ गुण तर सुहानी धोत्रे हिने ६ बळी टिपले. सानिका चाफे हिने २.३० व २.५० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. ओडीशाच्या अर्चनाने (१.५०, १.४० मि. ४ गुण) तर स्मरणिका (१.३० मि. ४ गुण) यांची अष्टपैलू खेळी अपुरी पडली.

हे ही वाचा:

दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

उत्तर मेक्सिकोमध्ये पार्टीत बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात सहा ठार

महाराष्ट्राच्या कुमार संघाने मात्र कोल्हापूरवर १८-१६ असा एक डाव राखून दोन गुणांनी सहज विजय मिळविला. यात गणेश बोरकर (१.१०, २ मि. संरक्षण व ४ गुण) व कर्णधार वैभव मोरे ( नाबाद १.१० मि. व ४ मि. संरक्षण व २ गुण), भरतसिंह वसावे (२, १ मिनिटे संरक्षण), रमेश वसावे (१.४०, १.२० मिनिटे संरक्षण) यांनी सर्वोत्कृष्ट खेळी करीत महाराष्ट्राचा विजय सुकर केला तर पराभूत कोल्हापूरच्या विराज घाटगे (१ मि. संरक्षण), शरद घाटगे (२ मिनिटे संरक्षण) केले मात्र त्यांना इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

तत्पूर्वी उपांत्य फेरीत महाराष्ट्रच्या कुमार संघाने कर्नाटकचा ३४-२० असा १५ गुणांनी पराभव केला. मुलींनी दिल्लीवर १८-१० असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला.

Exit mobile version