आपल्या विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या दिशेने निघालेलेले शेतकऱ्यांच्या मोर्चाचे लाल वादळ अखेर शमले आहे. राज्य सरकारने आमच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत, अशी घोषणा शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झालं आहे.
शेतकरी आंदोलक संघटनांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शुक्रवारी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे हा मोर्चा शेतकरी स्थगित करणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर हा मोर्चा स्थगित झाला असल्याचे गावित यांनी जाहीर केले आहे.
नाशिकहून निघालेला हा शेतकऱ्यांचा लॉंग मार्च गुरूवारी मुंबईच्या वेशीवर आल्यावर राज्य सरकाराने तातडीने पावले उचलली. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शेतकरी संघटना यांच्यात बैठक पार पडली होती. या बैठकीत सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची बहूतांश मागण्या मान्य केल्या. ठाणे जिल्हाधिकारी शनिवारी सकाळी वासिंद मुक्कामी असलेल्या शेतकरी लॉन्ग मार्चच्या ठिकाणी पोहचले.
जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी मोर्चाचे नेते जे.पी. गावित यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी गावित यांना राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्याच्या निवेदनाची प्रत गावित यांना दिली. जे.पी. गावित माध्यमांशी बोलतांना म्हणाले, काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. या निवेदनाची प्रत मोर्चेकरी शेतकऱ्यांना वाचून दाखवण्यात येईल. राज्य सरकारने आमच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतलं. त्यानुसार आता आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत असे जे.पी. गावित यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा:
ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन
अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…
तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण
भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?
निवेदनाचा व्हिडीओ गावात दाखवणार
मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेतही निवेदन दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गावागावात दाखवला पाहिजे असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे हा व्हिडीओ स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. मोर्चेकरी समाधानी आहे. काही उरलेल्या मागण्या लवकरच पूर्ण होणार आहे. असे गावित म्हणाले. यावेळी गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.