भितीदायक, महाराष्ट्राने ओलांडला ५०,००० रुग्णवाढीचा टप्पा

भितीदायक, महाराष्ट्राने ओलांडला ५०,००० रुग्णवाढीचा टप्पा

महाराष्ट्र आल्या दिवशी कोरोना रुग्णवाढीच्या बाबतीत नवा उच्चांक गाठत आहे. रविवारी महाराष्ट्राने रुग्णवाढीच्या बाबतीत पन्नास हजाराचा टप्पा पार केला आहे. रविवारी महाराष्ट्रात ५७,०४७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी देशात ९३,२४९ नवे कोरोना रुग्ण आढळले. म्हणजे देशात सापडलेल्या नव्या कोविड रुग्णांपैकी ५०% पेक्षा जास्त रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपेल. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

राज्यात ‘विकेंड’ लॉकडाऊन, काय आहेत नवे नियम?

कोळसा घोटाळ्यात ममतांचे हात काळे

आम्ही जनतेसोबत, पण सरकारच्या उपाययोजनांना आमचा पाठींबा

भाजपा राज्य सरकारला सहकार्य करेल

विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

तर आठवड्याचे उर्वरित पाच दिवसही नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. या कालावधीत दिवसा जमावबंदी असेल तर रात्री संचारबंदी आहे. रात्री ८ ते सकाळी ७ कोणालाही बिना कारणाचे रस्त्यावर फिरता येणार नाहीये. वित्तीय सेवा सोडून सर्व खासगी कार्यालये वर्क फ्रॉम होम तत्वावर कार्यरत राहतील तर सरकारी कार्यालये ५०% क्षमतेने कार्यरत राहतील. करमणुकीची स्थळे, मॉल्स, धार्मिक स्थळे, क्रीडा संकुले, सभागृहे इत्यादी बंद राहतील. उपहारगृहे, बार पूर्णपणे बंद राहतील तर हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेते पार्सल सेवा सुरु ठेवू शकतात. ई कॉमर्स सेवा सुरु राहील. तर एका इमारतीत ५ पेक्षा जास्त रुग्ण असतील तर त्याला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

Exit mobile version