चेंबूरच्या किंकाळ्या आधी ‘दिल्लीत’ नंतर ‘मुंबईत’ ऐकू आल्या!

चेंबूरच्या किंकाळ्या आधी ‘दिल्लीत’ नंतर ‘मुंबईत’ ऐकू आल्या!

मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाचे तांडव सुरु आहे. या पावसात मुंबईत तीन दुर्घटना घडल्याचे समोर आले आहेत. या दुर्घटनांचे स्वरूप इतके भीषण होते की दिल्लीही हादरली. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री सगळ्यांनी ट्विट करून या घटनेवर दुःख व्यक्त केले, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मात्र या साऱ्या गोष्टी समजण्यास अडीच तास जावे लागले. घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणे दूरच, मुख्यमंत्र्यांनी साधे ट्विट करून विषयाची दखल घ्यायलाही वेळ मिळाला नाही. दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्र्यांनी अखेर ट्विट केले.

मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे चेंबूर, विक्रोळी, आणि भांडूप येथे भिंत कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत २४ जणांनी आपले प्राण गमावल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री आणि शेजारील राज्यातील मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी तर विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आर्थिक मदतही जाहीर केली. पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना मात्र या घटनेबाबत शोक व्यक्त करायला आणि मदत जाहीर करायला दुपारचे १२.३० उजाडले.

हे ही वाचा:

पावसाने उडवली मुंबईकरांची झोप

विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा

पावसाच्या हाहाकाराने मुंबईत अपघातांची मालिका

‘या’ शिवसेना नेत्यामागेही लागला ईडीचा ससेमिरा

महाराष्ट्रात घडलेल्या या अपघातांची दखल घेत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी साडे दहा वाजता ट्विट करत आपला शोक व्यक्त केला. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी पाऊणे दहाच्या सुमारासच ट्विट करत शोक व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि मदतही जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजारांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आधी या घटनेची दखल घेतलेली दिसली. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र काहीही व्यक्त होताना दिसत नव्हते.

अखेर १२.३० वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे घोडे वारातीच्या मागून आले. त्यांनी या घटनेबद्दल औपचारिकता म्हणून ट्विट केले. यावेळी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहून आर्थिक मदत जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.

Exit mobile version