प्रेयसीला मारहाण करून तिला गाडीची धडक देणारा आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजीत गायकवाड याच्यासह त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांची प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर सोमवारी मुक्तता करण्यात आली.
अश्वजीत गायकवाड याच्यावर ठाण्यात त्याची प्रेयसी प्रिया सिंह हिच्या अंगावर गाडी घालण्याचा आरोप आहे. सर्व आरोपींची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या सर्वांना रविवारी अटक केली होती. तसेच, या गुन्ह्यात वापरलेली गाडीही पोलिसांनी जप्त केली होती. या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हे ही वाचा:
चीनमधील भूकंपात १११ ठार; २३० जखमी!
तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले
खर्गे म्हणतात, ‘ एक महिन्याचे वेतन काँग्रेसला दान केले’
२६ वर्षांच्या प्रिया सिंहने ती अश्वजीतसोबत प्रेमसंबंधात असल्याचा दावा केला आहे. ११ डिसेंबरला जेव्हा ती त्याला भेटायला गेली, तेव्हा त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. त्याने तिला मारहाण केली, तसेच, त्याच्या ड्रायव्हरला तिला धडक देण्यास सांगितले. यामुळे प्रिया सिंहला जबर दुखापत झाली आहे. तिच्या पायाचे हाडही मोडले असून संपूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहेत. तिने या प्रकाराची तक्रार पोलिस ठाण्यात केली, तेव्हा पोलिसांनी तिला दाद दिली नाही, असे तिचे म्हणणे आहे.
तिने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती देताच पोलिसांनी लगेच सक्रिय होऊन गुन्हा दाखल केला आणि त्यांनी आरोपींना अटक केली. अश्वजीतने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्याकडून खंडणी उकळण्यासाठी ती माझ्यावर असे आरोप करत आहे, असा दावा अश्वजीतने केला आहे.