शनिवारी महाराष्ट्राच्या भवितव्याचा होणार निर्णय

मतमोजणीनंतर महायुती की महाविकास आघाडी याचा होणार फैसला

शनिवारी महाराष्ट्राच्या भवितव्याचा होणार निर्णय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवार २३ नोव्हेंबरला लागणार असून त्यासाठी सगळी तयारी झालेली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून या निवडणुकांचे कल यायला सुरुवात होईल. २८८ जागांसाठी ही निवडणूक असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात टक्कर झालेली आहे..

या निवडणुकीत ४ हजार पेक्षा अधिक उमेदवार उभे होते. महायुतीतील भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशा सहा पक्षांत प्रामुख्याने लढती आहेत.

गेल्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेत महाविकास आघाडीचा प्रयोग केला पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षात फूट पडल्याने सहा पक्ष निवडणुकीत उतरले आहेत. या पाच वर्षांत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन सरकारे महाराष्ट्रात कार्यरत होती. या सरकारांच्या कामगिरीचा लेखाजोखा मतदार या निवडणुकीत घेणार आहेत. त्यामुळे कुणाच्या पारड्यात लोक मत टाकतात याचा निकाल शनिवारी लागेल.

हे ही वाचा:

ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलीस

कुस्तीपटू विनेश फोगट बेपत्ता, पोस्टर्स व्हायरल!

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर; आयपीएलच्या पुढील तीन हंगामाच्या तारखा जाहीर?

अटक टाळण्यासाठी केला हॉटस्पॉटचा वापर

करोनाचा भयंकर काळ जनतेने अनुभवला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी या पाच वर्षांत झालेल्या आहेत. आरोप प्रत्यारोपांची टोकाची पातळी या काळात लोकांनी अनुभवली आहे. लोक आता कुणाच्या पारड्यात पसंतीची मते टाकतात हे पाहायचे आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनपेक्षित निकाल लागले. पण त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतात का, खोटे नरेटिव्ह यावेळी चालतात का, महिलांसाठी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चमत्कार करते का, वोट जिहादचा काही फरक पडतो का, मराठा आरक्षणाचा कितपत प्रभाव पडतो, बंडखोरीचे काय परिणाम होतात, बटेंगे तो कटेंगे तसेच एक है तो सेफ है या घोषणेचा कसा प्रभाव पडतो अशा विविध मुद्द्यांचा ठसा या मतदानात उमटला आहे का, यावर २३ नोव्हेंबरला शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर कुणाचे सरकार स्थापन होईल, याचा फैसला होणार आहे.

 

Exit mobile version