नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री शक्तीची आराधना करण्याचा उत्सव. स्त्रियांमधील ऊर्जा, शौर्य, नेतृत्व, प्रेरणा, चातुर्य अशा अनेक प्रकृतींचा सन्मान करण्याचा हा सण. अशीच एक स्त्री जिचं नेतृत्व आणि शौर्य साऱ्यांना आजही प्रेरणा देत आहे. आणि त्या म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, छत्रपती शिवाजी महाराजांची सून, महाराज राजाराम यांच्या धर्मपत्नी आणि हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई.
मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराबाई यांचे नाव अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि राजाराम राजांच्या पत्नी अशी जरी त्यांची ओळख असली तरी स्वराज्य निर्माणासाठी त्यांनी दिलेलं योगदान हे बहुमूल्य आहे. मुघलांशी झुंजण्यासाठी त्यांनी स्वतः युद्धाची धुरा वाहिली आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले. ताराबाई यांचा जन्मचं मुळी लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजेचं छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला होता. तलवारबाजी, तिरंदाजी, घोडेस्वारी यासोबतच राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनचं ताराबाईंना मिळाल्यामुळे त्या हुशार आणि धाडसी होत्या. वयाच्या आठव्या वर्षी ताराबाईंचा विवाह राजाराम राजांशी झाला. स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठीचा हा अत्यंत संघर्षाचा काळ होता. अशातच १७०० साली महाराज राजाराम यांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याचा अंत झाला की काय अशी परिस्थिती वाटत असताना या जबाबदारीची धुरा महाराणी ताराबाई यांनी आपल्या हाती घेतली आणि इथूनच महाराणी ताराबाई यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज हेच वारसदार होते, परंतु ते मुघलांच्या कैदेत होते. ताराबाईंनी आपला मुलगा छत्रपती शिवाजी दुसरे यांना गादीवर बसवले आणि कारभार पाहू लागल्या.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांशी संबंधित एनआयएकडून पाच राज्यांत छापेमारी
पवारांनी लावली ७५ टक्के आरक्षणाची काडी
अमितभाई कल किसने देखा आताच निर्णय घ्या…
मराठा सैन्याच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोघल सैन्याला सतत हुलकावणी दिली. १७०० ते १७०७ या काळात ताराबाईंच्या जबरदस्त रणनीतीमुळे आणि राजकीय डावपेचांमुळे औरंगजेबाला मराठ्यांशी झुंज देत सात वर्षे दक्षिणेत मुक्काम करावा लागला. एकीकडे मैदानी लढाई लढता लढता ताराबाईंनी दुसरीकडे स्वराज्याची तिजोरीही आर्थिकदृष्ट्या बळकट केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांनी शाहू महाराजांची सुटका केली, पण स्वराज्यात दुही निर्माण झाली. शाहू महाराजांनी ताराबाई आणि छत्रपती शिवाजी दुसरे यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले. पुढे शाहू महाराजांनी साताऱ्याला गादी स्थापन केली आणि ताराबाईंनी कोल्हापूरला वेगळी गादी स्थापन केली. कालांतराने १७३० मध्ये, ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यातले वाद मिटले आणि महाराणी ताराबाई साताऱ्यात निवासाला गेल्या पण या मधल्या काळातल्या अंतर्गत कलहामुळे स्वराज्याची शक्ती कमकुवत झाली होती. पुढे १७६१ मध्ये ८६ व्या वर्षी राणी ताराबाईंचे निधन झाले. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्वराज्यासाठी झगडत राहिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांच्या विरोधात जवळपास २७ वर्षे लढाई दिली. रणरागिणी अशा या राणी ताराबाईंच्या धाडसामुळेचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना बळ मिळत राहिले आणि मराठ्यांचे साम्राज्य जिवंत राहिले. अशा या शौर्य रूपातील शक्तीला नमन!