उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून मेळावा सुरु होण्यासाठी अगदी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. सनातन धर्माच्या या सर्वात मोठ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देश-विश्वातून कोट्यवधी लोक येत आहेत. या पाहुण्यांमध्ये लाखो विदेशी पाहुणे येथे अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी येत आहेत. या परदेशी पाहुण्यांमध्ये ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांचाही समावेश आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीसोबत इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती आणि जिंदाल ग्रुपच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल यांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन पॉवेल जॉब्स १३ जानेवारी रोजी प्रयागराज येथे येणार आहेत. त्यानंतर त्या निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात १० दिवस मुक्काम करणार आहेत. शिबिरात त्यांच्या राहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या सुरक्षेसाठीही तयारी करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
हलगर्जीपणाबद्दल टोरेस घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच होणार चौकशी
दिल्लीतील शाळांना १२ वीच्या विद्यार्थ्याकडून बॉम्बची धमकी, चौकशीत मोठा खुलासा!
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित
मुस्लिमांना महाकुंभात येऊन दुकान मांडता येईल का?
या संपूर्ण काळात पॉवेल जॉब्स २९ जानेवारीपर्यंत कल्पवासात राहणार आहेत. त्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गंगेत अमृतस्नान करणार आहेत. हे स्नान महाकुंभाचे प्रमुख आकर्षण असून ते आध्यात्मिक शुद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यांचे हे पाऊल जागतिक स्तरावर सनातन संस्कृती आणि अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे लक्षण मानले जात आहे.
पॉवेल जॉब्स स्वामी कैलाशानंदांच्या शिबिरात योग, ध्यान आणि आध्यात्मिक चर्चांमध्ये सहभागी होतील. आचार्य महामंडलेश्वर यांनी सांगितले की, लॉरेन यांच्यावर भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माचा खूप प्रभाव आहे आणि त्यांनी यावेळी महाकुंभाच्या माध्यमातून ते जवळून अनुभवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाकुंभातील लॉरेनचा सहभाग भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माबद्दल तिची आस्था दर्शवितो. त्यांच्या उपस्थितीमुळे महाकुंभला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळू शकते.