मध्य प्रदेशातील मंदसौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत समजलेली महिला दीड वर्षांनी तिच्या घरी परतली आहे. विशेष म्हणजे, या महिलेच्या मृत्यू प्रकरणी सध्या चार आरोपी तुरुंगात आहेत. ललिताबाई असे या महिलेचे नाव आहे. भानपुरा तहसीलच्या गांधी सागर पोलिस ठाण्यात हजर होत तिने आपण जिवंत असल्याचे कबूल केले.
हे संपूर्ण प्रकरण मंदसौर जिल्ह्यातील गांधीसागर पोलीस स्टेशन परिसरातील नवली येथील आहे. १८ महिन्यानंतर ललिताबाई अचानक घरी परतल्याने सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या कथित हत्येप्रकरणी चार जणांना दोषी ठरवण्यात आल्यामुळे तिच्या पुन्हा हजर होण्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
खरे तर, ऑगस्ट २०२३ मध्ये, ललिताचे वडील नानुराम बनछडा यांनी ९ सप्टेंबर २०२३ रोजी व्हिडिओद्वारे गांधीसागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. झाबुआ येथे एका महिलेला ट्रकने चिरडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला; तिच्या कुटुंबाने तिची ओळख ललिता असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, मृत महिलेच्या हातावर टॅटू आणि पायाला काळा धागा बांधलेला होता, जो माझ्या मुलीच्या अंगावर देखील तसाच होता. ती ललिताच असल्याची खात्री पटल्यानंतर कुटुंबाने अंतिम संस्कार केले.
हे ही वाचा :
बंगल्यात रोकड सापडलेल्या दिल्लीतील न्यायाधीशांचे साखर कारखाना बँक घोटाळ्यात नाव
ट्रम्प यांचा चार देशांमधील स्थलांतरितांना दणका; ५ लाख स्थलांतरित होणार हद्दपार
सोमवारी पत्रकार शितोळे यांची शोकसभा
या प्रकरणात पोलिसांनी भानपुरा येथील इम्रान, सोनू, एजाज आणि शाहरुख यांना अटक केली होती, जे सध्या झाबुआ तुरुंगात आहेत. ललिता घरी परतल्यावर तिचे वडील नानुराम तिला गांधी सागर पोलिस ठाण्यात घेऊन गेले. जिथे ललिताने पोलिसांना ती जिवंत असल्याची माहिती दिली.
ललिताने सांगितले की मी शाहरुखसोबत भानपुरा येथे गेली होते. त्यानंतर त्याने माझे अपहरण केले. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर त्याने मला दुसऱ्या शाहरुख नामक व्यक्तीला विकले. त्या व्यक्तीसोबत मी कोटामध्ये दीड वर्ष राहिली. अखेर संधी मिळताच मी माझ्या गावी पळून आले, असे ललिताने सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण भागात बरीच चर्चा होत आहे.