मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबाला स्थानिक मौलानाने जाहीर केलेल्या सामाजिक बहिष्काराचा फटका बसला आहे. एका नर्तिकेने त्यांच्या घरी निकाह समारंभात घूमर नृत्याचे सादरीकरण केल्यामुळे मौलाना संतप्त झाले. असे नृत्य करणे धार्मिक प्रथेच्या विरोधात असल्याचे सांगून त्यांना एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या कुटुंबावर ११ महिने बहिष्कार घालण्यात आला आहे.
हरदा येथे राहणाऱ्या रशिदच्या कुटुंबाला बहिष्काराचा सामना करावा लागतो आहे. २८ जानेवारी रोजी, रशिद यांच्या निवासस्थानी मोईन आणि चंडी यांचा विवाह पार पडला. ३० जानेवारी रोजी रशीदने एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात त्याचे नातेवाईक, मित्र आणि त्याच्या शेजारील तसेच, आसपासच्या भागातील इतरांनी भाग घेतला होता. त्यांनी राजस्थानी कलाकारांना मेजवानीत मनोरंजनासाठी आमंत्रित केले होते आणि एका महिला नर्तिकेने तेथे घूमरही (पारंपरिक राजस्थानी लोकनृत्य) केले होते. या नृत्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राजस्थानी पोशाख घातलेली एक महिला नर्तक मोठ्या संख्येने प्रेक्षकांसमोर घूमर नृत्य सादर करताना दिसत आहे आणि पारंपरिक राजस्थानी वेशभूषेतील एक पुरुषही मंचावर तिच्यासोबत दिसत आहे. कार्यक्रमानंतर रशीदच्या शेजारच्या काही मौलवींनी एक बैठक बोलावली होती, ज्यात मुस्लिम समाजातील इतर सदस्यही सामील झाले होते. त्यांनी एकमताने निर्णय घेतला की, निकाहादरम्यान महिलांना नृत्य करण्यास मनाई आहे. रशीद आणि त्याच्या कुटुंबांनी इस्लामिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे तपासात आढळले आहे.
हे ही वाचा:
रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला २.११ लाख कोटी रुपये सर्वोच्च लाभांश मंजूर!
करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
शोधकार्यासाठी गेलेली एसडीआरएफची बोट उलटली; तीन जणांचा मृत्यू
१७ वर्षांत एकदाही विजेतेपद नाही
रशीद यांनी हरदाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तक्रारपत्र देऊन न्याय देण्याची विनंती केली आहे. त्याच्या कुटुंबीयांना ११ महिने कोणत्याही लग्नाला आमंत्रित न करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या वृद्ध आईने ही हुकूमत चुकीची असल्याचे म्हटले आहे. याविरोधात त्याचे कुटुंबीय पोलिसांत गेले, मात्र पोलिसांनी या आदेशामागील आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही.
रशीदने अखेर हरदाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अधिकाऱ्याने तत्काळ त्याच्या घरी आणि शेजारच्या ठिकाणी तपासासाठी एक पथक रवाना केले. दुसरीकडे, त्याच्या शेजाऱ्यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला की, त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला नाही तर त्याला ‘जाजम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुदायाच्या सामूहिक भोजन मेळाव्यातून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे.