भाजपा नेते किरीट सोमय्या हे गेल्या अनेक महिन्यांपासून मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. मुंबईतील विविध भागातील मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. मुलुंड, विक्रोळी, भांडूप, गोवंडी, घाटकोपर अशा अनेक ठिकाणच्या अनधिकृत भोंग्यांविरोधात त्यांनी आवाज उठवला असून रीतसर तक्रारीही दाखल केल्या आहेत. शिवाय प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे.
किरीट सोमय्या यांच्या या मोहिमेला यश मिळताना दिसत आहे. घाटकोपरमधील मशिदींवरील भोंगे हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “घाटकोपर येथील मशिदींवरील भोंगे जाणार. आज घाटकोपर (प.) पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. घाटकोपर पोलीस स्टेशनने आता सर्व मशिदींना नोटीस दिली आहे की, १५ इंच बाय १० इंच बॉक्स स्पीकरच वापरता येणार, भोंगे नाही. आता घाटकोपरही भोंगा मुक्त होणार.”
"घाटकोपर येथील मशिदींवरील भोंगे जाणार"
आज आम्ही घाटकोपर (प.) पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. घाटकोपर पोलीस स्टेशनने आता सर्व मशिदींना नोटीस दिली आहे की, 15 इंच X 10 इंच बॉक्स स्पीकरच वापरता येणार, भोंगे नाही.
आता घाटकोपरही भोंगा मुक्त होणार. @Dev_Fadnavis… pic.twitter.com/IaWxFFKvBp
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 22, 2025
मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत महत्त्वाचा निकाल दिला होता. मशिदींच्या भोंग्याविरोधात आवाजाची तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घेण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पहिल्यांदा समज द्या, नंतर दंड आकारा, पुन्हा आदेशाचे उल्लंघन केल्यास भोंगा जप्त करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिल्या होत्या. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी अनधिकृत भोंगेही पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते.
हे ही वाचा..
“लोकशाहीमध्ये संसदचं सर्वोच्च!”
“मुस्लिमांनी देशाच्या कायद्यांचा आदर करून पालन केले पाहिजे”
बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत
यापूर्वी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई व्हावी यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या किरीट सोमय्या यांना धमकीही मिळाली होती. सोमय्या यांनी मुंबईतील गोवंडी परिसरातील ७२ मशिदींमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या भोंग्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांना युसुफ अन्सारी नावाच्या व्यक्तीकडून धमकी मिळाली होती. यानंतर अनधिकृत भोंगे आणि मशिदींवर कारवाई होणारचं, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. शिवाय शिवाजी नगर, गोवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४०० अनधिकृत भोंगे आहेत. तर, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप येथील ८० टक्के मशिदींनी भोंग्यासाठी परवानगी घेतलेली नाही. मुंबई शहरात चार हजार अनधिकृत भोंगे आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.