आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे रंग बदलू लागले आहेत. गोवा येथील सनबर्न महोत्सवात शंकराच्या चित्रावरून वाद निर्माण झाला असून याबाबत भाजपने नव्हे तर चक्क आप आणि काँग्रेसने तक्रार केली आहे. एरवी भाजपवर टीका करणाऱ्या या पक्षांना चक्क सनातन धर्माबदल आस्था वाटू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोव्यातील सनबर्न महोत्सवात महादेवाचे चित्र दाखवल्याबद्दल काँग्रेस नेते विजय भिके यांनी आयोजकांविरुद्ध शुक्रवारी पोलिस तक्रार दाखल केली आहे. तर, ‘आप’चे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनीही महोत्सव आयोजकांकडे तक्रार दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
उत्तर गोव्यातील वागाटोर येथे सनबर्न ईडीएम हा लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सव सुरू होता. २८ डिसेंबरला सुरू झालेला हा महोत्सव ३० डिसेंबरपर्यंत सुरू होता. ‘लोक मद्यप्राशन करत होते आणि मोठ्या संगीतावर नाचत होते. आणि त्यामागे भगवान शंकराचे चित्र आक्षेपार्ह स्थितीत दाखवले जात होते. ईडी महोत्सवात झालेल्या या प्रकारामुळे माझ्या सनातन धर्माला धक्का पोहोचला आहे,’ असे ‘आप’चे अमित पालेकर यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे. हे लिहिताना त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही टॅग केले असून या प्रकरणी सनबर्नच्या आयोजकांविरुद्ध तत्काळ गुन्ह्याची नोंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
विनेश फोगटने अर्जुन, खेल रत्न पुरस्कार कर्तव्य पथावर सोडले!
इंडिया गटातील काँग्रेसच्या जागावाटपाच्या योजनेला तीन राज्यांत अडथळा!
महत्त्वाच्या ‘सर्वोच्च’ निकालांचे ठरले २०२३ हे वर्ष
छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखान्याला आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू
महोत्सवात भगवान शंकर मद्याला प्रोत्साहन देत आहेत, असे चित्र दाखवले जात होते, असा दावा पालेकर यांनी केला आहे. त्यामुळेच राज्याच्या पोलिसांनी या दखलपात्र गुन्ह्यांची त्वरित नोंद घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. पालेकर यांनी या संदर्भात गोव्याच्या पोलिस महासंचालकांनाही विनंती केल्याची माहिती पत्रकारांना दिली. ‘जेथे मद्य दिले जात होते, अशा ईडीएम महोत्सवात आमच्या देवाचे चित्र दाखवले जाणे योग्य नाही. शंकराचे चित्र पडद्यावर दाखवले जात असताना लोक दारू पित होते आणि नाचत होते,’ असे त्यांनी सांगितले.
‘भगवान शंकर हे दारू पिणे, प्रतिबंधित पदार्थांचे सेवन करणे आणि कार्यक्रमादरम्यान होणार्या इतर सर्व बेकायदा कृत्यांचे समर्थन करतात, असे चित्रण करून आयोजकांनी जाणूनबुजून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान केला आहे,’ अशी पोलिस तक्रार काँग्रेसनेते भिके यांनी या संदर्भात केली आहे. तर, त्यांना काँग्रेसकडून तक्रार प्राप्त झाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.