“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”

हार्दिक पंड्याने व्यक्त केल्या भावना

“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”

बहुचर्चित अशी क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलला लवकरच सुरुवात होणार आहे, यंदा चर्चा आहे ती ‘मुंबई इंडियन्स’चा नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंड्याची. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पंड्याला बहाल केले. यावर सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली. शिवाय काही नाराज चाहत्यांनी मुंबई इंडियन्स संघाच्या निर्णयावर टीकाही केली.

अशातच मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने प्रतिक्रिया दिली असून तो इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक आहे आणि पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराचे नेतृत्व करणे त्याला अजिबात त्रासदायक वाटणार नाही, असं त्याने म्हटलं आहे. तसेच हार्दिक पंड्या म्हणाला की, रोहित शर्माशी आगामी हंगामाविषयी अद्याप तपशीलवार बोलणं झालेलं नाही.

“या हंगामात दडपण किंवा असे काही वेगळे होणार नाही. हा एक चांगला अनुभव असेल. मी माझी सर्व कारकीर्द त्याच्या कर्णधारपदाखाली खेळली आहे. रोहित शर्मा ही भारतीय संघाचा कर्णधार आहे. यापुढेही काही मदत हवी असल्यास तो मला मदत करण्यासाठी तिथे असणार आहे. त्याने त्याच्या कर्णधारपदाखाली जे काही या संघासाठी साध्य केले आहे, ते आतापासून पुढे मला करायचे आहे,” असे हार्दिक पांड्या म्हणाला.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केल्यानंतर संघाचा कर्णधार म्हणून त्याला घोषित करणं ही एक आश्चर्याची आणि धक्कादायक बाब होती. हार्दिकने रोहितकडून कर्णधार पद स्वीकारल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते विभाजित झाले आहेत. रोहित शर्माने कर्णधारपद गमावल्यामुळे चाहत्यांच्या मोठ्या वर्गाने निराशा व्यक्त केली आहे. शिवाय मुंबई इंडियन्सच्या संघाकडून याची घोषणा होताच त्यांच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या संख्येने घट झाल्याचे पाहायला मिळाले.

“आम्ही चाहत्यांचा आदर करतो. त्याच वेळी, आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करतो. मी जे नियंत्रित करू शकत नाही त्यावर मी लक्ष केंद्रित करत नाही. पण, मी चाहत्यांचा खूप आभारी आहे. ते जे बोलतात ते बोलण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मी त्यांच्या मताचा आदर करतो. त्याच वेळी, आम्ही चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करू,” अशा भावना हार्दिक पांड्या याने चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांवर व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

एसबीआयला निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील उघड करण्याचे निर्देश

एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!

कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला सात हजार कोटींची देणगी!

हार्दिक पंड्या हा सध्या मुंबई इंडियन्सच्या संघासोबत जोरदार सराव करताना दिसत आहे. तर, इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताला ४-१ ने विजय मिळवून देणारा रोहित शर्मा लवकरच मुंबई इंडियन्सच्या शिबिरात सामील होण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स रविवार, २४ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

Exit mobile version