लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!

पंतप्रधान मोदींसह बड्या नेत्यांचा बैठकीत समावेश

लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!

भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची दुसरी बैठक सोमवारी रात्री उशिरापर्यंत चालली. आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी सात राज्यांतील सुमारे ९० नावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत विशेषतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणातील उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, प्रल्हाद जोशी, नित्यानंद राय आणि सुशील मोदी, किशन रेड्डी आणि अन्य राज्यांतील नेते उपस्थित होते.

हे ही वाचा..

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपासून काढला पळ?

जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!

यावेळी गुजरातमधील ११ जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा झाली, त्यातील सात नावांवर आधीच शिक्कामोर्तब झाले आहे. तर, मध्य प्रदेशमधील पाचपैकी चार जागांवर चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील २५, तेलंगणातील आठ आणि कर्नाटकमधील २८ जागांवरही चर्चा झाल्याचे समजते. कर्नाटकमध्ये जनता दल (सेक्युलर) ला तीन जागा दिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. बिहार, तमिळनाडू आणि ओडिशामध्ये अन्य घटकपक्षांसोबत अद्यापही वाटाघाटी सुरू असल्याने या उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत.

भाजपने २ मार्च रोजी १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून लढतील, हे स्पष्ट झाले होते. या यादीत केंद्रीय आणि राज्याच्या ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आले होते. त्यात दोन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.

Exit mobile version