शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार

शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार

२०१९ मध्ये चीनच्या वुहानमधून उद्भवलेल्या कोरोना व्हायरसने आता चीनमध्ये पुनरागमन केले आहे. चीनमध्ये शून्य कोविड पॉलिसीवर चालणाऱ्या कोरोनाने भयंकर रूप धारण केले आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाचे दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चीन सरकारने कोरोनाची दहशत पाहता सर्वात मोठे व्यापारी शहर शांघायमध्ये कडक लॉकडाऊन लागू केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढलं आहे. त्यामुळे चीनच्या मोठ्या शांघाय शहरात कडक लॉकडाऊन लागले असून, सुमारे शांघाय शहरातील २६ दशलक्ष लोकांचे कामकाज ठप्प झाले आहे. शांघायमध्ये एवढे कडक लॉकडाऊन लागले आहे की, लोकांना रस्त्यावरून येजाही करण्यास मनाई आहे. त्यामुळे शांघायकरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शांघायमध्ये कडक लॉकडाऊनमुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. खाद्यपदार्थांची टंचाई निर्माण झाली असून अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ संपले आहेत. लोक रस्त्यावरून जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांकडून किंवा त्यांच्या शेजाऱ्यांकडून जेवण मागवत आहेत. बराच वेळ घरांमध्ये बंदिस्त असल्याने लोकांचे मानसिक हाल होत आहे. मूलभूत गरजांसाठी तिथल्या लोकांना संघर्ष करावा लागतोय.

महामारीमुळे चीनमध्ये मीडियावरसुद्धा बंदी आहे मात्र चीनचे काही धक्कादायक फोटो सोशल मीडियावरून समोर येत आहेत. असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक मदतीची याचना करताना दिसत आहेत. लोक त्यांच्या घराच्या खिडक्यांमधून मदतीसाठी ओरडत आहेत.

हे ही वाचा:

देशभरातील १० हजार मंदिरांना मोहित कंबोज देणार लाऊडस्पीकर

एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!

शोपियानमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान; २ जवान शहीद

रणबीर आलियाचा ‘सावरीया’

दरम्यान, शांघाय हे चीनचे सर्वात मोठे शहर असून तिथे ओमिक्रॉनचा प्रकार पसरत चालला आहे. गेल्या २४ तासांत २६ हजारांहून अधिक रुग्ण तिथे आढळले आहेत. यापैकी १ हजार १८९ रुग्ण लक्षणे असलेले आहेत, तर २५ हजार १४१ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. मोठ्या प्रमाणात प्रकरणे आढळल्याने आरोग्य सेवांवरील भार वाढला आहे.

Exit mobile version