महाराष्ट्रात गेले काही दिवस सातत्याने कोरोना रुग्णवाढ नोंदली गेली आहे. मुंबई, औरंगाबाद, अमरावती, धुळे यांच्यासह नागपूरात देखील रुग्णवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि इतर काही महत्त्वाची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
नागपूरमध्ये दिनांक १५ मार्च ते २१ मार्च या कालावधीसाठी हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
नितीन राऊत यांनी सांगितले की, नागपूरातच नाही तर ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार- रविवार बंदला म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याची माहिती आहे. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे.
त्यामुळे आता कठोर निर्णय घेऊन लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत मद्य विक्री बंद राहणार असून, लसीकरणासह अत्यावश्यक सेवा, डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याची दुकाने चालू राहणार आहेत अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. यांच्यासोबत खासगी कंपन्या आणि सरकारी कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांसह चालू राहणार आहेत.
नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७१० नव्या रुग्णांची नोंद झाली तर आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र तरीही लोकांनी बेजबाबदारपणा दाखवत अजूनही मास्क न घालण्याचे सत्र चालूच ठेवले आहे.
कल्याण- डोंबिवलीतही निर्बंध
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवलीतही निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्या २४ तासात कल्याण- डोंबिवली भागात ३९२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कल्याण- डोंबिवली भागात नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. बार आणि रेस्टॉरंट रात्री ९ पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहेत. तर घरपोच सेवेला मात्र रात्री १० पर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. इतर दुकाने सकाळी ७ रात्री ७ या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. एक दिवसाआड रस्त्याच्या एका बाजूची दुकाने चालू राहतील.