महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. देशातले सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण सध्या महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमध्ये नव्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बीड, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून हा लॉकडाऊन लावला जाणार आहे. बीड आणि नांदेड जिल्ह्यांत लॉकडाऊनचा कालावधी दहा दिवसांचा असणार आहे. तर परभणीत आठवडाभराचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चार एप्रिलपर्यंत बीड आणि नांदेडमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. दरम्यान प्रशासनाकडून दूध आणि भाज्या विक्रेत्यांना सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर परभणीत सकाळी सहा ते नऊ या कालावधीत दूध, किराणामाल याची घरपोच सेवा देता येणार आहे. परभणीत ३१ मार्चच्या रात्रीपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
हे ही वाचा:
आंतरराष्ट्रीय उड्डाणांना एप्रिल पर्यंत स्थगिती
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले
महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबत केंद्र सरकारतर्फेही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात कोविड रुग्णांची जी वाढ होत आहे त्यात महाराष्ट्र राज्य क्रमांक पहिला आहे. महाराष्ट्रात रोज कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक होताना दिसत आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे जिल्हा क्रमांक एक ला आहे. पुणे व्यतिरिक्त नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांव्यतिरिक्त कर्नाटकातील बंगलोर अर्बन जिल्ह्याचा सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.