सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला

सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मुंबई उपनगरीय रेल्वेचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हार्बर मार्गावरून पनवेलला जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवार, २६ जुलै रोजी सकाळी ९.३९ वाजता एक लोकल पनवेलसाठी निघणार होती. त्यासाठी या गाडीला हिरवा सिग्नल देण्यात आला होता. पण ही गाडी सरळ जाऊन स्थानकाच्या बाहेर पडणं अपेक्षित असताना गाडी उलटी स्थानकात गेली आणि डेड एंड म्हणजेच बफरला जाऊन धडकली. या धडकेमुळे या गाडीचा एक डबा रुळावरून घसरून प्लॅटफॉर्मवर चढला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असून काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत

मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान

पाचव्या मजल्यावरून चिमुरडी पडली! तिला कुणी झेलले?

पुण्यात शिकाऊ विमान शेतात कोसळलं, पायलट जखमी

या अपघातामुळे हार्बर मार्गावरची उपनगरीय रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हार्बर मार्गाचे दोन प्लॅटफॉर्म्स असून हा अपघात एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर झाला आहे. दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून धीम्या गतीने वाहतूक सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाला या अपघाताचा फटका बसला नसून वाहतूक सुरळीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. घसरलेला डबा बाजूला करण्यासाठी आणखी अर्धा- पाऊण तास लागणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version