गणेशोत्सव साजरा तरी कसा करायचा ? मंडळांचा सवाल

गणेशोत्सव साजरा तरी कसा करायचा ? मंडळांचा सवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिकेने नियमावली तयार करून त्यानुसारच घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मात्र पोलीस आणि स्थानिक महापालिका अधिकारी वेगळेच नियम पाळण्यासाठी मंडळांना भाग पाडत आहेत. राज्य सरकार आणि महापालिकेचे नियम वेगळे आणि स्थानिक पालिका व पोलिसांचे वेगवेगळे नियम असल्यामुळे मंडळे त्रस्त झाली असून अनेक मंडळे उत्सव साजरा न करण्याच्या तयारीत आहेत, अशी तक्रार मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोना काळातील आर्थिक संकटे लक्षात घेता महापालिकेने मंडळांना जाहिराती घेण्यास परवानगी दिली असताना अनेक ठिकाणी मंडळांना जाहिराती लावण्यास प्रतिबंध होत आहे. तर अनेक ठिकाणी ठरलेल्या आकारापेक्षा छोटे मंडप उभारण्यास सांगितले जात असल्याची तक्रार आहे. सरकारी नियमांच्या अटी व्यतिरिक्त हमीपत्रे लिहून घेतली आहेत, असे काहींचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

फक्त ऑनलाईन दर्शनाला परवानगी आहे, की नियमांचे पालन करून प्रत्यक्ष दर्शन घेता येईल, आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरावेत का, व्यवसायिक जाहिरातींना पोलिसांकडून का विरोध केला जात आहे, भाविकांना हार फुले आणायला परवानगी आहे का, काही ठराविक पोलीस ठाणी वेगळी हमीपत्रे का मागत आहेत, असे काही प्रश्न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रात उपस्थित केले आहेत.

भक्तांकडून गणेशमूर्तींवर हार फुले अर्पण करणार नाही, असे हमीपत्र देण्याचा आग्रह साकीनाका पोलीस ठाणे धरत आहे, असे समितीचे म्हणणे आहे. महापालिकेच्या टी विभागात (मुलुंड) जाहिराती लावण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तसे न झाल्यास दंड वसुली केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. महापालिकेने आणि राज्य सरकारने परवानगी दिलेली असताना प्रभाग स्तरावर उलट निर्णय का घेतले जात आहेत, असे पत्रात विचारले आहे. समितीने पत्र पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही पाठवले आहे. सबंधित प्रकरणावर तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन समितीने केले आहे.

Exit mobile version