इंडिगो विमान कंपनीच्या विमानात अडकलेला एक लोडर थेट अबु धाबीला गेल्याची घटना घडली आहे.
मुंबई अबु धाबी असा प्रवास करणाऱ्या इंडिगो ए ३२० या विमानाच्या ६ई-१८३५ विमानाच्या सामान ठेवण्याच्या जागी सामान आणून ठेवणारा लोडर अडकला. पण विमान संयुक्त अरब अमिरातीत उतरल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले.
मुंबईत प्रवाशांचे सर्व सामान विमानात ठेवल्यानंतर एक लोडर त्या सामानामध्येच झोपला. त्यामुळे कुणालाच तो आतमध्ये अडकल्याचे लक्षात आले नाही. रविवारी हे विमान मुंबई ते अबु धाबी रवाना झाले.
या विमानाने उड्डाण केले तेव्हा त्या लोडरला जाग आली पण तोपर्यंत कार्गोचे दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. विमानाने मुंबई विमानतळही सोडले. संयुक्त अरब अमिरातीत विमान उतरले, तेव्हा त्याला बाहेर पडता आले. त्यावेळी अबु धाबीतील विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्याची प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा:
मिस युनिव्हर्स हरनाजला मिळणार या उत्तमोत्तम सुविधा आणि घसघशीत कमाई!
ड्रग्सच्या तस्करीसाठी बांगड्या, हेल्मेट, स्टेथोस्कोप !
सोनियांच्या घरी शरद पवार भेटीला
आमचा उमेदवार गरीब होता; नाना पटोले यांनी दिले स्पष्टीकरण
या सगळ्या तपासण्या पार पडल्यावर अबु धाबी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून त्याला पुन्हा मुंबईला जाण्यासाठी परवानगी मिळाली. तेच विमान जेव्हा मुंबईला रवाना झाले तेव्हा त्यातून या लोडरला मुंबईकडे पाठविण्यात आले. हवाई उड्डाण विभागाच्या महासंचालकांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात इंडिगो विमान कंपनीकडे विचारणा केल्यावर त्यांच्याकडून सांगण्यात आले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. संबंधितांना त्याची कल्पना देण्यात आली आहे आणि याची चौकशी सुरू आहे.